गेल्या दोन आठवड्यांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये सावरकरांच्या नावावरून मोठा वाद सुरू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा प्रभाग नव्या प्रभाग रचनेमध्ये रद्द करण्यात आल्यानंतर त्यावरून भाजपानं रान उठवलं आहे. शिवसेनेनं हिंदुत्ववादी विचार संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप भाजपाकडून आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला होता. त्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला दात असताना आता शिवसेनेनं भाजपाला शह देण्यासाठी नवी खेळी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या सावरकर सभागृहाचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह गेल्या १५ ते २० वर्षांपासून बंद अवस्थेत होतं. सभागृहाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे हे सभागृह बंद करण्यात आलं होतं. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून ते बंद अवस्थेतच होतं. यानंतर आता या सभागृहाचं नुतनीकरण करण्यात आलं असून त्याचं उद्धाटन शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
शिवसेनेची खेळी आणि भाजपाला शह!
एकीकडे भाजपाकडून सावरकर प्रभागाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली जात असताना आता या खेळीला शह देण्यासाठी शिवसेनेनं गुरुवारी आदित्य ठाकरेंच्या हस्ते या सभागृहाचं उद्घाटन करून संदेश दिला आहे, अशी चर्चा कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाली आहे.