केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील अंतिम यादीत समावेश व्हावा यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांतील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सध्या लगबग सुरू आहे. या दोन्ही शहरांमधील महापालिकांनी या योजनेसाठी शेकडो कोटी रुपयांचे आराखडे तयार केले आहेत. त्यामध्ये शहराचा चेहरामोहरा बदलू शकतील अशा विकास प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अथक परिश्रम घेऊन हे आराखडे तयार करण्यात आले असले तरी केंद्र आणि राज्य सरकारच्या पसंतीस ते उतरायला हवेत. तरच या अराखडय़ातील किमान प्रकल्पांना गती मिळू शकणार आहे. त्यामुळे अंतिम शहरांच्या यादीत ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या शहरांचा समावेश असेल का याविषयी कमालीची उत्सुकता आहे. हे जरी खरे असले तरी या प्रकल्पाच्या माध्यमातून शहर नियोजनाचा पुन्हा एकदा वेगळ्या अंगाने विचार सुरू झाल्याचे या निमित्ताने दिसून आले. स्मार्ट सिटी योजनेत या शहरांचा समावेश झाला नाही तरी शहर कसे असावे, तेथील सुविधा कशा असाव्यात याचा विचार प्रशासकीय पातळीवर किमान कागदावर उतरवला गेला हे मूळ योजनेचे फलित म्हणायला हवे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरांमधील रहिवाशांसाठी रेल्वे व्यवस्था ही जीवनवाहिनी मानली जाते. असे असले तरी ही दोन्ही स्थानक परिसर म्हणजे समस्यांचा आगार होऊन बसली आहेत. स्मार्ट सिटी योजनेचा आराखडा तयार करण्याच्या निमित्ताने का होईना कल्याणात आयुक्त ई. रवींद्रन यांनी फेरीवाला मुक्त स्थानकांची घोषणा केली आहे, तर ठाण्यात संजीव जयस्वाल यांनी वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी पायाभूत सुविधांचे जाळे विणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या दोन्ही प्रयत्नांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळाली तर उत्तमच, परंतु तशी ती नाही मिळाली तरी विकासाचा मार्ग कोणत्या दिशेने आखायला हवा याची जाणीव स्थानिक प्राधिकरणांना झाली हीच स्मार्ट शहराची पायाभरणी ठरेल.

जयेश सामंत-नीलेश पानमंद
केंद्र तसेच राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ठाणे शहराचा विकास करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सविस्तर विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसार शहराचा समूह विकास, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात (पूर्व) वाहतूक सुधारणा प्रकल्प, खाडीकिनाऱ्याचे संवर्धन आणि सुशोभीकरण अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा या आराखडय़ात समावेश आहे. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवे विस्तारित स्थानक, तीन हात नाका परिसरात वाहतूक सुधारणा यांसारख्या जुन्याच परंतु महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचाही या विकास आराखडय़ात समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांचे सहकारी ठाणे शहराचा ‘स्मार्ट’ आराखडा नेमका कसा असावा याचा आढावा घेत होते. आपले शहर कसे असावे यासाठी ठाणेकरांनी नोंदविलेल्या मतांच्या आधारे हा स्मार्ट सिटीचा आरखडा तयार करण्यात आल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी तो १०० टक्के खरा नाही. जयस्वाल यांना अपेक्षित असलेल्या अनेक प्रकल्पांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून या आराखडय़ावर एका अर्थाने जयस्वाल यांची छाप दिसून येत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही त्यास मान्यता दिल्याने हा आराखडा राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या आराखडय़ास मंजुरी मिळाली का तसेच ठाणे शहराचा स्मार्ट शहराच्या अंतिम यादीत समावेश असेल का, हे प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे. असे असले तरी यानिमित्ताने तयार झालेला विकास आराखडा हा एक प्रकारे शहराची ‘ब्लू प्रिंट’ ठरू शकणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ५५५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अर्थातच केंद्र अथवा राज्य सरकारकडून एवढा मोठा निधी उभा राहण्याची सुतरामही शक्यता नाही. तरीही यापैकी काही प्रकल्प खासगी लोकसहभागातून विकसित करण्याची तयारी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. शहरातील लहान सांडपाणी प्रक्रिया केंद्र, वायफाययुक्त शहर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची योजनांची आखणी केव्हाच पूर्ण होत आली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेत या प्रकल्पांचा समावेश झाला नाही तरी हे प्रकल्प प्रत्यक्षात येतील, असे चित्र आहे. या विकास आराखडय़ात ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसराच्या विकासासाठी तब्बल ९०० कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे.

ठाणे पूर्व वाहतूक सुधारणा
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करीत असल्याचे रेल्वेच्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. हे प्रवासी दुचाकी, चारचाकी, रिक्षा तसेच परिवहन सेवेच्या बसगाडय़ांचा शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी वापर करतात. ही वाहने स्थानक परिसरात येत असल्याने पश्चिम भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. त्यामुळे काही वर्षांपूर्वी स्थानकाच्या पश्चिम भागात वाहतूक सुधारणा प्रकल्प राबविण्यात आला. या पुलामुळे वाहतूक कोंडी काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, स्थानकाच्या पूर्व भागातही आता वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली असून या भागात खासगी बसगाडय़ांची मोठय़ा प्रमाणात रहदारी असते. त्यामध्ये ठाणे पूर्व स्थानक ते कासारवडवली या मार्गावर धावणाऱ्या तसेच विविध कंपन्यांच्या बसगाडय़ांचा समावेश असतो. या गाडय़ांना पश्चिम भागात बंदी असल्यामुळे पूर्व भागातील वाहतुकीवर त्यांचा ताण वाढू लागला आहे. याशिवाय, ठाणे, नवी मुंबई, बेस्ट अशा परिवहन सेवेच्या बसगाडय़ांचीही त्यात भर पडत आहे. त्यामुळे पश्चिमेच्या धर्तीवर महापालिकेने ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व) वाहतूक सुधारणा प्रकल्प राबविण्याचा विचार केला असून त्याचा स्मार्ट सिटीच्या आराखडय़ात त्याचा समावेश केला आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प
मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे शहरातील तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी या जंक्शनवर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही दिसत असून त्यामुळे शहर वाहतुकीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने तिन्ही चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात तीन हात नाका जंक्शनची निवड करण्यात आली आहे. या बदलासाठी सेवा रस्त्यांच्या आड येणारी जलवाहिन्या तसेच विविध सेवा वाहिन्या दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचाही स्मार्ट सिटी आराखडय़ात समावेश करण्यात आला असून त्यासाठी १२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कोपरी ते कळवा खाडी परिसराचा विकास
कोपरी ते कळवा भागात असलेल्या खाडी परिसराचा विकास करण्यासाठी महापालिकेने वॉटरफ्रंट विकास प्रकल्प आखला असून त्याचा स्मार्ट सिटीच्या आराखडय़ात समावेश केला आहे. या प्रकल्पासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आराखडय़ानुसार खाडी परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

नवे रेल्वे स्थानक
ठाणे रेल्वे स्थानकातील लोकल गाडय़ांच्या मानाने प्रवाशांचा ताण वाढू लागला असून तो कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या जागेवर नवीन स्थानक उभारण्याची मागणी पुढे येऊ लागली होती. तसेच हे स्थानक उभारण्यासाठी शिवसेनाही आग्रही असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ठाण्यात घेतलेल्या बैठकीत शिवसेनेने स्थानकाचा मुद्दा मांडला होता. असे असतानाच आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही ठाणे ते मुलुंड स्थानकादरम्यान असलेल्या मनोरुग्णालयाच्या जागेत नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचा विचार सुरू केला असून त्यांनी स्मार्ट सिटीच्या आराखडय़ामध्ये या स्थानकाचा समावेश केला आहे. स्मार्ट सिटीमधील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पॅन सिटी योजना..
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील एका भागाचा (पॅन सिटी) विकास करण्यात येणार आहे. या माध्यमातून महापालिकेने शहरामध्ये विविध प्रकल्प राबविण्याची योजना आखली आहे. पॅन सिटीकरिता ९०० कोटी तर शहरातील विविध प्रकल्पांसाठी ५७३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पॅन सिटीअंतर्गत वॉटर ऑडिट, एनर्जी ऑडिट, स्काडा पद्धतीने पाणीपुरवठा नियंत्रण ही कामे आणि शहरात विविध ठिकाणी २००० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह नूतनीकरण ५० कोटी, बहुमजली पार्किंगसाठी ३० कोटी, नाला प्रकल्पासाठी ३५ कोटी, मलनि:सारण प्रकल्पासाठी ५० कोटी, गांवदेवी भूमिगत पार्किंग योजनेसाठी ३० कोटी, मासुंदा व हरियाली तलाव संवर्धन व सुशोभीकरण प्रकल्पासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प स्मार्ट सिटीअंतर्गत प्राप्त होणारा निधी, खासगी लोकसहभाग तसेच महापालिका निधी यामधून राबविण्यात येणार आहेत.

Story img Loader