कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिका प्रशासनाने रात्रीच्या वेळेत रस्ते धूळ मुक्त करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून रात्रीच्या वेळेत रस्ते सफाई यांत्रिक वाहनाच्या माध्यमातून आणि सफाई कामगारांतर्फे स्वच्छ केले जात आहेत. गेल्या सहा दिवसाच्या कालावधीत सुमारे १५ टन माती, १५० टन कचरा रस्त्यावरून हटविण्यात आला.
दिवसा अशाप्रकारची कामे करताना रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीमुळे साफसफाईची कामे करताना कर्मचाऱ्यांना अडथळे येतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेत ही मोहीम राबविण्यात येत आहे. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त अतुल पाटील, साहाय्यक आयुक्त प्रीती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, उप मुख्य स्वच्छता अधिकारी मोहनीश गडे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे हे ही मोहिम राबवित आहेत. प्रभागाप्रमाणे अधिकाऱ्यांचे नियंत्रण आणि सफाई कामगार नियुक्त करून स्वच्छतेची कामे रात्रपाळीत केली जात आहेत. रात्रीच्या वेळेत रस्ते धूळमुक्त केल्याने दिवसा या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू झाली तरी धूळ उडत नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून २३ रस्ते रस्ते सफाई यांत्रिक वाहनाच्या माध्यमातून तर, ५७ रस्ते सफाई कामगारांच्या माध्यमातून धूळ मुक्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा…बदलापुरच्या हवेत बुधवारी नायट्रोजनडायऑक्साईड ? एका तासात नायट्रोजनडायऑक्साईडचे प्रमाण ३२५ वर
ब
कल्याणमध्ये मोहने प्रवेशद्वार, प्रेम ऑटो ते व्हर्टेक्स साॅलिटीएर संकुल, खडकपाडा ते झुलेलाल चौक, डोंबिवलीत इंदिरा चौक ते गावदेवी मंदिर, तिसगाव नाका ते मलंग रस्ता याठिकाणचे रस्ते सफाई करण्यात आले आहेत. चार रस्ते सफाई यंत्रे, २०० सफाई कामगार यांच्या माध्यमातून ही कामे केली जात आहेत. प्रभाग स्तरावरील स्वच्छतेची जबाबदारी आणि कामगारांंवरील नियंत्रण स्वच्छता अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि धूळ मुक्त राहत असल्याने ही स्वच्छता मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे, असे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. रात्रीच्या वेळेत वरिष्ठ अधिकारी अचानक स्वच्छतेचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेटी देत आहेत.