डोंबिवली : वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे कल्याण, डोंबिवलीतील बहुतांशी ग्राहकांनी आपल्या घरातील जुने खणखणारे दूरध्वनी भारत संचार निगमच्या कार्यालयात जमा केले. हे दूरध्वनी जमा केल्यानंतर या संचाच्या माध्यमातून जी अनामत रक्कम दूरध्वनी नवीन घेताना ग्राहकांनी भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) कार्यालयात जमा केली होती. ती परत मिळणे आवश्यक होते. आता अनेक ग्राहकांनी दूरध्वनी जमा करून पाच ते सहा वर्ष उलटली तरी त्यांना परतावा (रिफंड) रक्कम मिळाली नसल्याचे ग्राहकांनी सांगितले.
संपर्कासाठी दूरध्वनी वापरण्यास सुरूवात झाली. त्यावेळी मध्यमवर्गीय नोकरदार, व्यावसायिक कुटुंबीयांनी ‘बीएसएनएल’चे दूरध्वनी घेण्यास प्राधान्य दिले. हे दूरध्वनी घेताना त्या संचावर सुमारे आठशे ते तीन हजार रूपयांपर्यंत अनामत रक्कम ग्राहकांनी सुरूवातीच्या काळात भरली. संपर्कासाठी मोबाईल किंवा इतर माध्यमे नव्हती. त्यावेळी घरातील काळा खणखणारा काळाकुट्ट दूरध्वनी हे महत्वाचे साधन होते. यापूर्वी नोकरदार वर्गांच्या घरात हे दूरध्वनी अग्रक्रमाने आले. सुरुवातीच्या काळात या दूरध्वनीचा वापर परिसरातील नागरिक संपर्कासाठी करायचे.
मोबाईल क्रांती झाल्यापासून घरातील दूरध्वनी बहुतांशी ग्राहकांनी ‘बीएसएनएल’कडे जमा केले. या संचाच्या माध्यमातून जी अनामत रक्कम भरली होती ती पंधरा ते महिनाभरात ग्राहकाला मिळणे अपेक्षित होते. दूरध्वनी जमा करून काही ग्राहकांना पाच ते सहा वर्ष झाली तरी त्यांची रक्कम बँक खात्यात जमा झालेली नाही. नव्याने दूरध्वनी बाजारात आले. त्यावेळी घेणारा नोकरदार नागरिक हा ३० ते ४० वयोगटातील होता. आता हे दूरध्वनी नावे असलेले बहुतांशी ग्राहक हे ७० ते ८० वयोगटातील आहेत.
आपली हक्काची रक्कम ‘बीसएनएल’कडून मिळत नसल्याने आठवड्यातून ते दोन ते तीन वेळा डोंबिवली एमआयडीसीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरा शेजारील ‘बीएसएनएल’च्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. तेथे एक सुरक्षा रक्षक, चुकून एखादा कर्मचारी बसलेला दिसतो. त्यांना अनामत रक्कम का मिळत नाही, याची कोणतीही उत्तरे देता येत नाहीत, असे दूरध्वनी ग्राहकांनी सांगितले. ‘बीएसएनएल’मधील बहुतांशी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्याने त्याचा फटका ग्राहक सेवेला बसत आहे. बीएसएनएलच्या कार्यालयात संपर्क केला तर तेथे कोणी फोन उचलत नाही. उचलला तरी नीट उत्तरे दिली जात नाहीत, अशा तक्रारी दूरध्वनी ग्राहकांनी केल्या.
‘बीएसएनएल’मधील लेखा विभागातील एका अधिकाऱ्याने सांंगितले, दूरध्वनी ग्राहकाने जर त्यांचे बँक खात्याची समग्र माहिती बीएसएनएल कार्यालयाला दिली नसेल तर त्यांना परतावा मिळण्यात अडचणी येतात. आम्ही कोणाचीही परताव्याची रक्कम प्रलंबित ठेवत नाहीत. त्यांना आम्ही परतावा रक्कम तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न करतो. करोना काळात ही रक्कम मिळण्यात अडचणी होत्या. आता अशी कोणतीही अडचण नाही.