कल्याण – नवरात्रौत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करा, असे आदेश आयुक्तांनी देऊनही बांधकाम विभागातील सुस्त अभियंत्यांमुळे डोंबिवली, कल्याण शहरातील अनेक महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे कायम असून त्याचबरोबर वर्दळीचे रस्ते सुस्थितीत केले नसल्यामुळे धुळीचे लोट कायम आहेत. ठेकेदाराने गेल्या १५ दिवसांच्या कालावधीत वजनदार माजी नगरसेवक, पालिका अधिकारी यांच्या घर परिसरातील रस्ते सुस्थितीत करण्याचे काम उरकले. परंतु उर्वरित अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे असून त्याचबरोबर रस्त्यावर बारीक खडी पसरल्याचे चित्र आहे.
पावसाळा संपल्यानंतर कल्याण, डोंबिवलीतील रस्ते सुस्थितीत होतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु नागरिकांचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव काळात शहरातील रस्ते सुस्थितीत करा, असे पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी आदेश देऊनही शहरातील रस्त्यांची दुरावस्था मागील दोन महिन्यांपासून कायम आहे. रस्त्यांवर डांबर टाकून वरवरची मलमपट्टी केली जाते. डांबरीकरणाची केलेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याची ओरड होत आहे. पाऊस जाऊनही रस्ते सुस्थिती केले जात नसल्याने आणि धुळीमुळे हैराण झालेले नागरिक दररोज थेट आयुक्तांकडे तक्रारी करत आहेत. यापूर्वी खड्डे बुजविण्याच्या कामात हयगय केली तर संबंधित ठेकेदाराची देयके अडवून ठेवली जात होती. नियंत्रक अभियंत्यावर निलंबनाची कारवाई आयुक्तांकडून केली जात होती. मागील दीड वर्षापासून हा प्रकार बंद असल्याने अधिकारी, ठेकेदारांची मनमानी वाढली आहे. ठेकेदाराने डांबरीकरणाची कामे करताना वजनदार नगरसेवक, माजी महापौर, सभापती, वजनदार पालिका अधिकारी, अभियंते यांच्या घर परिसरातील रस्ते सुस्थितीत ठेवण्यात धन्यता मानली आहे. प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या खराब रस्त्यांवर १५ ते २० फुटांचे ठराविक अंतराने डांबरीकरण करून रस्ते सुस्थितीत केल्याचा देखावा ठेकेदाराने उभा केल्याच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा – ठाणे : आनंदनगर-साकेत उन्नत मार्गापुढे समस्यांचा डोंगर, मुख्य मार्ग अरुंद होण्याची भिती
खडीचे ढीग
डोंबिवली, कल्याण शहरांच्या अनेक भागांत अधिकृत गृहप्रकल्प सुरू आहेत. या बांधकामासाठी लागणारी खडी, लोखंड, माती वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली आहे. बेकायदा बांधकामाच्या ठिकाणी निघालेली माती रात्रीच्या वेळेत खाडी किनारा भागात टाकली जाते. या अवजड वाहतुकीमुळे पालिकेने डांबराने बुजवलेले खड्डे उखडून जात आहेत. झोकून काम करेल असा एकही अभियंता क्षेत्रिय पातळीवर नाही. नियंत्रक अभियंते रस्त्यावरील देखरेखीसाठी फिरण्याऐवजी त्यांचा निम्मा वेळ आयुक्त, शहर अभियंता दालनातील बैठका, मंत्रालय, न्यायालयीन कामासाठी फेऱ्या मारण्यात जात आहे. त्यामुळे रस्ते कामे ठेकेदार मनमानीने करत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रभागस्तरावर काम करण्यासाठी कनिष्ठ अभियंता दर्जाची तगडी फळी नाही. बांधकाम कार्यकारी अभियंत्यालाच कनिष्ठ, उपअभियंता, साहाय्यक अभियंता ही कामे पार पाडवी लागत असल्याचे समजते.
खराब रस्ते
९० फुटी रस्ता, घराड सर्कल, नेहरू रस्ता, गणेशनगर विष्णुनगर पोलीस चौकी, गुप्ते रस्ता, सुभाष रस्ता, संतोषी माता रस्ता, मानपाडा रस्ता.