कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला काही दिवस पिवळसर रंग आणि ते पाणी दुर्गंधी युक्त असण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हे पाणी पाहून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हे पाणी नागरिकांनी उकळून, गाळून प्यावे, असे आवाहन केले आहे.
कल्याण डोंबिवली शहरांना उल्हास नदीतून पाणी पुरवठा केला जातो. या नदीला पडलेला जलपर्णीचा विळखा काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारपासून एक यंत्राच्या साहाय्याने उल्हास नदीत सुरूवात केली आहे. जलपर्णीच्या मुळाशी चिखलाचे लगदे आहेत. यांत्रिक सयंत्राच्या साहाय्याने ही जलपर्णी काढताना पाणी अधिक गढुळ होत आहे. जलपर्णींच्या पानांचा पाण्यावरील वेढा यंत्राच्या साहाय्याने काढताना पानगळ, काही पानांचा चुरा होत आहे. या नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या कामासाठीचे काम करताना उल्हास नदीतून कल्याण, डोंबिवली शहरांना पिवळसर रंगाचा दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.
घरातील नळाला पिवळसर रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी आले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हे पाणी उल्हास नदीतील जलपर्णी बाहेर काढताना निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झाले आहे. पालिकेच्या बारावे जलशुध्दीकरण केंद्रात हे पिवळसर दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने या केंद्रातील क्लोरीनची मात्रा प्रमाणात ठेऊन पाणी शुध्द ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले.
उल्हास नदीतील जलप्रदूषण विषयावर मागील काही वर्षापासून कल्याणमधील पर्यावरणप्रेमी व मी कल्याणकर संस्थेचे संस्थापक नागरिक नितीन निकम नदीच्या पाण्यात बसून बेमुदत आंदोलन करत आहेत. त्यांना पर्यावरणप्रेमी श्रीनिवास घाणेकर, उमेश बोरगावकर, कैलास शिंदे आणि अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांची साथ मिळत आहे. मागील काही दिवसापूर्वी त्यांनी हे आंदोलन केले होते. जोपर्यंत पालिका, शासनाकडून उल्हास नदी शुध्द राहील यासाठी प्रयत्न केले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा उपोषणकर्ते निकम यांचा प्रयत्न आहे.
उल्हास नदी पात्रात विविध शहरांमधून अधिक प्रमाणात प्रदुषित सांडपाणी सोडले जाते. अलीकडच्या काळात या नदीतील जलपर्णींचे प्रमाण वाढत आहे. ही जलपर्णी पाणी अशुध्द, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. निकम यांच्या आंदोलनाची गंभीर दखल शासनाकडून घेण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी दोन यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामधील एक यंत्राच्या साहाय्याने शुक्रवारपासून उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी दोन यंत्रांची उपलब्धता झाली आहे. यामधील एक यंत्राने उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास सुरूवात झाली आहे. हे काम आठ दिवसात पूर्ण केले जाईल. दुसरे यंत्र लवकरच सक्रिय होईल.उपेंद्र कुलकर्णी उपप्रादेशिक अधिकारी, कल्याण.
घरातील नळाला पिवळसर दुर्गंधीयुक्त पाणी आले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हे पाणी उकळून, गाळून प्यावे. उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू असल्याने पाण्याचा रंग बदलला आहे. अशोक घोडे कार्यकारी अभियंता, कडोंमपा.