हिंदू देव-देवता, संत-महंतांबद्दल सतत व्देषपूर्ण विधाने करुन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, वारकरी संप्रदायाचा अपमान करत भाषणे देत राज्यभर फिरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी शनिवारी कल्याण, डोंबिवली बंद ठेवण्याचा निर्णय सर्व हिंदुत्ववादी संघटना, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेतला आहे.
हिंदु देवदेवतांबद्दल सतत गरळ ओकण्याचे काम सुषमा अंधारे यांनी थांबविले नाहीतर त्यांना कल्याण, डोंबिवलीत पाय ठेऊ दिला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे (बाळासाहेबांची शिवसेना) डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी शुक्रवारी येथे दिला. महायात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे राज्यभर फिरत फक्त हिंदू, देवदेवता, संत, महंत, वारकरी संप्रदाय यांना लक्ष्य करुन नागरिकांच्या भावना दुखविण्याचे काम करत आहेत. समाजमध्ये तेढ वाढवित आहेत, त्यामुळे त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी. अंधारे यांचा जाहीर निषेध करण्यासाठी शनिवारी कल्याण, डोंबिवली बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमध्ये बजरंग दल, सर्व हिंदुत्ववादी संघटना, ज्वेलर्स संघटना, रिक्षा संघटना, बाळासाहेबांची शिवसेना पक्ष सहभागी होणार आहे. नागरिक, व्यापारी, आस्थापना यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केले आहे.
हेही वाचा>>>कल्याण : तुरुंगातून सुटल्यानंतरही गुन्ह्यांची मालिका कायम
बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी एक पत्रक प्रसिध्द करुन हिंदूंच्या तीव्र भावना दुखविल्याने अंधारे यांचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी अंधारे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे.शिवसेना शाखेत बंदनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेला बाळकृष्ण महाराज, प्रकाश महाराज, तुकाराम महाराज पाटील, वारकरी संप्रदायाचे प्रमुख, रमेश म्हात्रे, राजेश कदम, दीपेश म्हात्रे, संतोष चव्हाण, महेश पाटील उपस्थित होते.