कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता अनेक विक्रेत्यांनी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर, अंंतर्गत गल्ल्यांमध्ये वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने फटाके विक्रीचे मंच उभारले आहेत. या मंचांमुळे गेल्या आठवडाभर प्रवाशांनी दिवाळी सणामुळे त्रास सहन केला. आता दिवाळी संपल्याने पालिकेने वाहतुकीला अडथळा ठरणारे फटाके विक्रीचे मंच तातडीने हटवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. याच कालावधीत दिवाळी सण आला. पालिकेचा बहुतांशी अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना पालिकेतून विहित वेळेत मंच उभारणीची परवानगी मिळाली नाही. बहुतांशी विक्रेत्यांनी वर्दळीच्या रस्त्यांवरील मिळेल त्या मोक्याच्या जागा बळकावून तेथे मंच उभारले. हे विक्रेते राजकीय मंडळींचे समर्थक होते. एका बड्या राजकीय नेत्याने पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना संपर्क करून दिवाळीचे पाच दिवस फटाके विक्री मंचावर कारवाई करू नये अशी मागणी केली होती.
हेही वाचा : महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
या मागणीचा विचार करून पालिका अधिकाऱ्यांंनी वाहतुकीला अडथळा होऊनही या मंचांकडे दुर्लक्ष केले. या फटाके विक्री मंचांमुळे मागील पाच दिवस कल्याण, डोंबिवली शहरे वाहतूक कोंडीत अडकली होती. पालिका, पोलीस कोणीही फटाके विक्रेत्यांना रस्ता का अडविला म्हणून जाब विचारत नव्हते किंवा त्यांच्यावर कारवाई करत नव्हते. त्यामुळे प्रवाशांसह वाहन चालकांची सर्वाधिक अडचण झाली होती.
डोंबिवलीत फडके रस्ता, महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, गुप्ते रस्ता, दिनदयाळ रस्ता, नेहरू रस्ता, कल्याणमध्ये शिवाजी चौक, रेल्वे स्थानक परिसर, संतोषी माता रस्ता, सहजानंद चौक भागात फटाके विक्रीचे मंच उभारण्यात आले होते. या मंचांमुळे केडीएमटीच्या बस, अवजड वाहने रस्त्यावरून वळणे घेताना अडखळत होती. त्याचा फटका पादचारी, प्रवाशांना बसत होता.
आता दिवाळी संपल्याने पालिकेने फेरीवाला हटाव पथक, अतिक्रमण नियंत्रण पथकातील कामगारांच्या माध्यमातून रस्तोरस्ती उभारण्यात आलेल्या फटाके विक्री मंचांवर कारवाई करून रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.