कल्याण- पावसाने उघडीप दिल्याने गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर दिवसा, रात्री भटकी गुरे बसत असल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना अडथळे येत आहेत. आतापर्यंत खड्डयांमुळे त्रस्त प्रवासी, वाहन चालकांना गुरांच्या रस्त्यावरील बैठकांचा उपद्रव सुरू झाला आहे.
दिवसा गुरे रस्त्यावर बसली असली तर दुचाकी चालक, पादचारी गुरांना बाजुला करण्याचे काम करतात. काही वेळा चौक, रस्त्याच्या भागात तैनात वाहतूक पोलीस गुरांना रस्त्यांवरुन उठविण्याचे काम करतात. रात्रीच्या वेळेत गुरे रस्त्यावर बसली की रस्त्यावर शुकशुकाट असतो. अशावेळी वाहन चालक, त्याच्या सहकाऱ्याला रस्त्यावर उतरुन गुरांना बाजुला करावे लागते, अशा तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. कल्याण, डोंबिवलीत काही स्थानिक नागरिक गाई, म्हशींचे संगोपन करतात. बाजाराच्या ठिकाणी गुरांना टाकाऊ भाजीपाला खाण्यासाठी मिळत असल्याने गुरे दिवसा-रात्री या भाजीपाल्यावर ताव मारुन रवंथ करण्यासाठी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर बैठक मारतात.
कल्याण मधील बिर्ला महाविद्यालय, खडकपाडा रस्ता, लालचौकी, गोविंदवाडी, शहाड, कोळसेवाडी, पुना लिंक रस्ता, नेतिवली मलंगगड रस्ता, डोंबिवलीत शीळ रस्ता, मानपाडा रस्ता, घरडा सर्कल ते टिळक रस्ता, टिटवाळा येथील गणपती मंदिर रस्ता, बल्याणी वासुंद्री रस्त्यांवर गुरे बसत असल्याने वाहतुकीला नवीन अडथळा येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्याच्या काळात मुसळधार पाऊस, खड्ड्यांमुळे त्रस्त वाहन चालक, प्रवासी आता गुरांच्या अडथळ्यांमुळे हैराण आहेत. हा त्रास पुढील आठ महिने सुरू राहील असे वाहन चालकांनी सांगितले. या भटक्या गुरांचे मालक शोधून पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना दंड ठोठावण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.