कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत शासनाच्या परवानगीविना एकूण आठ प्राथमिक शाळा सुरू आहेत. कल्याण डोंंबिवली पालिकेने अशा आठ प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली आहे. या आठ अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी केले आहे.

मागील वर्षी पालिका हद्दीत एकूण पाच अनधिकृत शाळा आढळून आल्या होत्या. दरवर्षी अशा शाळांवर शासन आदेशानुसार पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. एप्रिल, मे महिन्यात अनेक पालक आपली घरी बदलतात, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने शहर बदलतात. असे पालक शाळेची माहिती न काढता त्या शाळेत प्रवेश घेतात. अशी प्रवेश घेतलेली शाळा शासन मान्यतेने सुरू नसल्याचे नंतर निदर्शनास येते. त्यामुळे अनेक विद्यार्थी, पालकांचे नुकसान होते. यासाठी पालिकेने मार्च महिन्यात अशा आठ शाळांची यादी प्रसिध्द करून पालकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वाधिक अनधिकृत प्राथमिक शाळा टिटवाळा परिसरात असल्याचे पालिका शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. शिक्षण विभागाचा अनुभव असलेले काही जाणकार मंडळी शासनस्तरावर शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही की आपल्या भागात शासन मान्यतेविना शाळा सुरू करतात. त्यानंतर ते शाळा मान्यतेसाठी प्रयत्न करतात, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

अनधिकृत शाळांची माहिती

एल. बी. एस. इंग्लिश स्कूल, बल्याणी, टिटवाळा (इंग्रजी माध्यम), सनराईज स्कूल, बल्याणी, टिटवाळा (इंग्रजी माध्यम), संकल्प इंग्लिश स्कूल, बल्याणी, टिटवाळा (इंग्रजी माध्यम), पोलारिस काॅन्व्हेंट स्कूल, बल्याणी, टिटवाळा (इंग्रजी माध्यम), डी. बी. एस. इंग्लिश स्कूल, आंबिवली पश्चिम (इंग्रजी माध्यम), ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, आंबिवली पश्चिम (इंग्रजी माध्यम), बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कुल, महाराष्ट्रनगर, डोंबिवली पश्चिम.(इंग्रजी माध्यम).

अशा अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले जाणार आहे. तसेच, संबंधित शाळांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी अशा प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये. आपल्या परिसरात कोठे अनधिकृत शाळा सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांंनी पालिकेशी संपर्क साधावा.

संजय जाधव, उपायुक्त, शिक्षण विभाग.

Story img Loader