कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मुख्य वर्दळींच्या रस्त्यावर शासनमान्य असा फलक असलेल्या अनेक टपऱ्या काही वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहेत. या टपऱ्यांमध्ये कोणतेही व्यवसाय चालत नाहीत. वर्दळीच्या रस्त्यांवर गटारे, पदपथांवर या टपऱ्या असल्याने या टपऱ्या पादचाऱ्यांना, वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनमान्य असा फलक असलेल्या या टपऱ्यांवर कारवाई केली तर नाहक टपरी मालक, वरिष्ठांच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वाटत असल्याने कोणीही पालिका अधिकारी या टपऱ्यांवर कारवाई करण्यास धजावत नाही. काही टपऱ्यांवर कल्याण डोंबिवली पालिकेचा नोंदणी क्रमांक आहे. गटई श्रेणीतून या टपऱ्या टपरी मालकांना मिळाल्या आहेत. या टपऱ्यांमध्ये टपरी मालकाने लघु व्यवसाय करणे अपेक्षित असते. परंतु, अनेक टपरी मालकांनी आपल्या टपऱ्या परप्रांतीय मंडळींना विविध प्रकारच्या वस्तू, कपडे विक्री व्यवसायासाठी भाड्याने चालविण्यास दिल्याच्या तक्रारी आहेत.

रस्त्यांच्या बाजुला, पदपथ अडवून असलेल्या या टपऱ्यांवर टपरी मालकांनी पावसाळ्यात टपरीत पाऊस येऊ नये म्हणून मोठे पत्रे ठेवले आहेत. या पत्र्यांची धारदार टोके रस्ता, पदपथाच्या दिशेने आली आहेत. अवजड वाहन रस्त्यावरून जात असेल तर या पत्र्यांचा अडथळा संबंधित वाहनाला होऊन वाहतूक कोंडी होते. शहर सौंदर्यीकरणाचे अनेक उपक्रम कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे राबविण्यात येत आहेत. शहरातील मोकळ्या, रस्ता दुभाजकांमधील जागा, शहराची प्रवेशद्वारे सुशोभित दिसतील यादृष्टीने पालिकेकडून कामे केली जात आहेत. या सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरणामध्ये शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील धूळखात पडलेल्या, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या अडसर ठरत आहेत.

या टपऱ्यांसंदर्भात पालिकेच्या प्रभागातील काही साहाय्यक आयुक्तांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की या टपऱ्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर आहेत. त्यावर शासनमान्य असा फलक आहे. काही टपऱ्या पालिकेचा नोंदणी क्रमांंक असलेल्या आहेत. या टपऱ्या शासन, पालिकेकडून वितरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या टपऱ्यांवर थेट कारवाई करता येत नाही. केली तर टपरी मालकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. अनेक टपऱ्यांमध्ये चालक व्यवसाय करत नाहीत. या टपऱ्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून हटविणे खूप गरजेचे आहे. यासाठी वाहतूक विभागाने एखादा प्रस्ताव पालिकेला पाठविणे आवश्यक आहे. असे प्रस्ताव आले तर या टपऱ्यांचा नक्कीच विचार करणे प्रशासनालाही शक्य होईल.