कल्याण- मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या तुरळक पावसाने कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागातील गटारे सफाई न झाल्याने तुंबली. पावसाच्या पाण्याने गटारातील गाळ, सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरातील रहिवासी, पादचारी, वाहन चालकांचे हाल झाले.मे अखेरपर्यंत गटार सफाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. ही कामे वर्षानुवर्षाचे राजकीय मंडळींचे ठराविक ठेकेदार घेतात. पावसाच्या तोंडावर कामे सुरू करायची आणि पाऊस सुरू झाला की शहरातील गटार सफाई पूर्ण झाल्याची संपूर्ण देयके काढायची, ही पालिकेतील पध्दत असल्याने त्याचा फटका दरवर्षी पालिकेच्या तिजोरीला आणि पाणी तुंबल्याने नागरिकांना बसत आहे.
नाले, गटार सफाई, पावसाळ्यापूर्वीचे रस्त्यांवरील खड्डे, चऱ्या भरण्याची कामे शहर अभियंता विभागाच्या नियंत्रणाखाली होतात. विद्यमान शहर अभियंता अर्जुन अहिरे हे दालन सोडून क्षेत्रिय पाहणी करण्यासाठी बाहेरच पडत नसल्याच्या तक्रारी आहेत. नागरी समस्यांसंदर्भात त्यांना संपर्क केला तर ते प्रतिसाद देत नाहीत, असे नागरिक सांगतात.
हेही वाचा >>>सरस्वती हत्या प्रकरण: मनोज सानेची आज वैद्यकीय आणि मानसिक तपासणी होणार
मंगळवार रात्रीच्या पहिल्याच तुरळक पावसात गटारे ओसंडून वाहू लागली. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती भयावह होण्याची, आरोग्य, रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी शहर अभियंता अहिरे यांना शहराच्या विविध भागात दौरे करण्यास सांगून गटार सफाईची कामे योग्यरितीने झाली आहेत की नाही याची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक भगवान पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा >>>जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन कमजोरच; नऊ वर्षांनंतर १३ जूनचा उशिराचा मुहुर्त साधला; सरासरी ३० मिलीमीटर नोंद
पाणी तुंबल्याची ठिकाणे
डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर मधील राघो आबा सोसायटी ते जानकी जीवन सोसायटीच्या दरम्यान भोईर नावाच्या भूमाफियाने एक बेकायदा इमारत बांधली आहे. गोपाळ बाग जवळील या बेकायदा इमारतीसाठी या भागातील २०० मीटर लांबीचे गटार बांधकामाचे साहित्य, जेसीबी येजा करण्यासाठी माफियाने तोडून टाकले आहे. पालिकेच्या ग प्रभागाने गेल्या वर्षी दोन वेळा या बेकायदा इमारतीवर कारवाई केली होती. भूमाफियाने पुन्हा या बेकायदा इमारतीला पत्रे लावून या भागात गटार बांधणी होणार नाही अशी व्यवस्था केली आहे, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या. गोपाळ बाग परिसर वर्दळीचा रस्ता आहे. पहिल्याच पावसात या भागात बुधवारी गुडघाभर पाणी तुंबले. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर या भागात पूरपरिस्थिती असेल, असे पाटील म्हणाले.आयुक्तांनी गटार सफाई न करणाऱ्या ठेकेदारांची देयके अदा करू नयेत, अशी मागणी भगवान पाटील यांनी केली.
हेही वाचा >>>जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन कमजोरच; नऊ वर्षांनंतर १३ जूनचा उशिराचा मुहुर्त साधला; सरासरी ३० मिलीमीटर नोंद
कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा प्रवेशव्दार रस्त्यावर गटारातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना तुंबलेल्या पाण्यातून वाहने चालवावी लागली. तुंबलेल्या पाण्यामुळे डासांची निर्मिती होऊन साथीचे आजार वाढण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. प्रभाग साहाय्यक आयुक्त, अभियंते गटार सफाई कामात मलई मिळत नसल्याने या कामांकडे दुर्लक्ष करतात. पहिल्याच पावसात गटार सफाईचा बोजवारा उडाल्याने आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी माजी नगरसेवक भगवान पाटील यांनी केली आहे.