कल्याण – हातात पुस्तक घेऊन वाचण्यात एक वेगळी मजा असते. ती मजा आताच्या यंत्रयुग आणि तांत्रिक प्रगतीमुळे कमी होत चालली आहे. समाज माध्यमे, मोबाईलमध्ये आताची पिढी अडकत चालली आहे. या नव तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन कट्टे खूप गरजेचे आहेत, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी रविवारी येथे केले.
सार्वजनिक वाचनालय कल्याण आणि वसंत व्हॅली परिसरतर्फे शिवाजी महाराज जयंती निमित्त साहित्य वाचन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त डाॅ. दांगडे मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला शहर अभियंता अर्जुन अहिरे, उपायुक्त धैर्यशील जाधव, उपायुक्त अतुल पाटील, सचिव संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर, ग्रंथपाल गौरी देवळे, करुण कल्याणकर उपस्थित होते.
हेही वाचा – बदलापूर रेल्वे स्थानकात चोरी करणारा डोंबिवलीतून अटक
हेही वाचा – ठाणे:ऑडी मालकाकडून श्वानाची हत्या
शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पुस्तके, कथा, कादंबऱ्या साहित्य वाचकांसाठी वाचनालयातर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला, पुरुष या वाचन कट्ट्यावर उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी वाचन करून वाचनाची आवड नागरिकांमध्ये निर्माण करणारे कदम यावेळी उपस्थित होते. आयुक्त डाॅ. दांगडे यांनी उपस्थितांशी संवाद साधून समाज माध्यमे, मोबाईलपेक्षा पुस्तकातून मिळणारी माहिती परिपूर्ण असते. पुस्तक वाचनातून मिळणारा आनंद अलौकिक असतो. याचे भान ठेऊन प्रत्येकाने मोबाईलपेक्षा पुस्तक वाचनाकडे अधिक वळणे आवश्यक आहे, असे सूचित केले.