कल्याण: मागील दोन महिन्याच्या जुलै, ऑगस्टमध्ये कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत डेंग्यूचे २८८, मलेरियाचे ९९ रूग्ण आढळून आले. पावसाळा सुरू झाल्यापासून पालिका हद्दीत नागरी आरोग्य केंद्र, बहुद्देशिय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पालिका हद्दीत साथ आजाराचे रुग्ण शोधण्यासाठी २० हजाराहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. साथ आजाराची बाधा असलेल्या संशयित रुग्णांच्या रक्त तपासण्या करून त्यांना तात्काळ उपचार करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळा सुरू झाल्यानंतर विविध प्रकारचे साथ आजार तोंड वर काढतात. पावसाळातील हे आजार नियमितचे असल्याने कल्याण डोंबिवली पालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाने पावसाळा सुरू झाल्यानंतर साथ आजार बळावू नयेत. संशयित रुग्णांना वेळीच उपचार होऊन ते बरे व्हावेत यादृष्टीने पालिका हद्दीत सर्वेक्षण केले. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल, साथरोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण राबविण्यात आले.

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांची, पाठराखण करणारा पथक प्रमुख निलंबित

पालिका हद्दीत ज्या ठिकाणी नवीन गृहप्रकल्प, पुनर्विकास इमारतींचे प्रकल्प सुरू आहेत. त्याठिकाणी डासांच्या अळ्या तयार होऊन तेथील कामगार किंवा परिसरातील रहिवाशांना कोणत्याही साथ आजाराची बाधा होणार नाही यादृष्टीने नोटिसा देण्यात आल्या होत्या. याबाबतीत हलगर्जीपणा करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात आली, असे डाॅ. पानपाटील यांनी सांगितले.

पालिका हद्दीत जुलैमध्ये एकूण ४८४ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले. यामधील १४० रुग्ण सकारात्मक डेंग्यू आढळले. ऑगस्टमध्ये १९० संशयित डेंग्यू रूग्ण आढळले. यामधील ८८ रुग्ण डेंग्यूची बाधा झालेले होते. एकूण ६७४ डेंग्यू रुग्ण दोन महिन्याच्या कालावधीत आढळले. बाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळतील यादृष्टीने पालिकेतर्फे प्रयत्न करण्यात आले.

जुलैमध्ये पालिका हद्दीत जुलैमध्ये आठ हजार ६९७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या तपासणीमधून २९ रुग्ण मलेरिया बाधित असल्याचे निष्पन्न झाले. ऑगस्टमध्ये ९ हजार ६४० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ७० रुग्ण मलेरिया बाधित आढळले. मलेरियासाठी एकूण १८ हजाराहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. पाऊस सुरू असल्याने साथ आजार वाढू नयेत यादृष्टीने जनजागृती मोहीम शहरात राबवली जात आहे. जंतुनाशक, किटकनाशक फवारणी नियमित सुरू असते.

हेही वाचा : दुबईचे बनावट दिनार चलन देऊन डोंबिवलीतील घाऊक औषध विक्रेत्याची चार लाखाची फसवणूक

डेंग्युचे तीन रुग्ण

डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग कार्यालयासमोर एक गृहप्रकल्प सुरू आहे. या गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी पाण्याची साठवण करण्यात आली आहे. येथील पाण्यात डेंग्यू डासाच्या अळ्या तयार झाल्या असण्याची शक्यता परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या गृहप्रकल्पा शेजारील सुंदराबाई सोसायटीमधील तीन रहिवाशांना डेंग्युची बाधा झाली आहे. या सोसायटीतील रहिवाशांनी यासंबंधी पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी एक पत्र दिले आहे.

हेही वाचा : बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप

पावसाळ्यात पालिका हद्दीत साथआजार वाढू नयेत यादृष्टीने काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या, बाधित रुग्णांवर पाठपुरावा करून उपचार करण्यात आले. साथ आजार रोखण्यासाठी जंतूनाशक फवारणी, अळ्या तयार होणार नाहीत यादृष्टीने संबंधितांना नोटिसा दिल्या. पाऊस सुरू असल्याने सर्वेक्षण, संशयित रुग्ण शोध मोहिमा सुरू आहेत.

डाॅ. प्रतिभा पानपाटील (साथरोग नियंत्रण अधिकारी)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli more than 387 dengue malaria cases recorded css