कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भाग वाहन कोंडी मुक्त, उड्डाण आणि पादचारी पुलांची उभारणी करून पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे रस्ते, असे नियोजन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून केले आहे. गेल्या चार वर्षापासून सुरू असलेली ही कामे आता प्रगतीपथावर असून या कामातील काही अडथळे लवकरच दूर करून हा प्रकल्प नागरिकांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसर सुधारणांतर्गत (सॅटिस) राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ५६८ कोटीची तरतूद आहे. मे. किंजल ग्रुपकडून या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. ६५० कामगार आणि ९० तांत्रिक आणि इतर कर्मचारी या प्रकल्पावर दैनंदिन काम करत आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, प्रकल्प अभियंता रोहिणी लोकरे, मे. किंजल ग्रुपचे अभियंते हा प्रकल्प गतिमानतेने पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा…घोडबंदर मार्गावर मध्यरात्री वाहतुक बदल

मुरबाड रस्त्याने आणि पत्रीपुलाकडून वलीपीर रस्त्याने येणारी वाहने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातून उड्डाण पूलावरून धावतील, अशा नियोजनातून मुरबाड रस्त्यावरील सुभाष चौक ते बैलबाजार दिशेने दीड किमी लांबीच्या उड्डाण पुलाची उभारणी केली जात आहे. या पुलाची एक मार्गिका सर्वोदय गार्डन संकुल रस्त्यावर उतरविण्यात येत आहे. बस आगारात येणाऱ्या बस पुलावरून डी आकारातून थेट आगारात येणार आहेत. या पुलाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे, असे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले.

उड्डाण पूल ते रेल्वे स्थानकांच्या दरम्यान पादचारी पूल असेल. पादचारी पूल सुरक्षेच्या दृष्टीने रात्री ११ नंतर बंद केला जाईल. त्यानंतर प्रवासी जिन्यावरून फलाटावरून रिक्षा वाहनतळ, बस आगारात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे स्थानकालगतचे मोजके रिक्षा वाहनतळ सुरू ठेऊन रस्त्यावर एकही रिक्षा उभी राहणार नाही, असे नियोजन केले जात आहे. बस आगाराच्या ठिकाणी बस आगार, कार्यशाळा आणि प्रशासकीय, वाणीज्य इमारत असणार आहे. या इमारतीचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे.

हेही वाचा…ठाण्याला वाढीव पाणी मिळण्याची आशा, वाढीव पाणी देण्याबाबत अभ्यास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले

सॅटिस प्रकल्पाच्या कामात दीपक हॉटेल समोर नगररचना विभागाने सीमारेषा निश्चित करून देणे, साधना हॉटेलसमोर रेल्वे जागेत, काही टपरी मालकांचे पुनर्वसन हे अडथळे आहेत. हे अडथळे काढले की या भागातील कामे झटपट मार्गी लावण्याचे नियोजन आहे, असे लोकरे यांनी सांगितले.

दिलीप कपोते वाहनतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. कल्याण रेल्वे स्थानक भागातून दररोज पाच लाख प्रवासी जाऊ शकतील, ८० हजार रिक्षा, २५ हजार खासगी वाहने धाऊ शकतील असे भविष्यवेधी नियोजन करून या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे, असे किंजल ग्रुपच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा……मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका

कल्याण पश्चिम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेली रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पातील बहुतांशी कामे प्रगतीपथावर आहेत. लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. – रोहिणी लोकरे,कार्यकारी अभियंता, स्मार्ट सिटी प्रकल्प.