कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील घरडा सर्कल येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या नियंत्रणाखालील सावळाराम महाराज क्रीडासंकुलाच्या नुतनीकरणाचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सुमारे २६ कोटीचा निधी पालिकेला उपलब्ध करून दिला आहे. या नुतनीकरणामुळे विस्कळीत झालेल्या क्रीडासंकुलाला नवे रूप मिळणार आहे.

तीस वर्षापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या नियंत्रणाखालील डोंबिवली एमआयडीसीतील १९ एकरचा भूखंड घरडा सर्कल येथील भूखंड कल्याण डोंबिवली पालिकेला क्रीडाविषयक उपक्रम राबविण्यासाठी एक रूपया नाममात्र भाड्याने दिला. या भूखंडावर पालिकेने शहरातील खेळाडुंच्या गरजांचा विचार करून तरण तलाव, बॅडमिंट कोर्ट, बंदिस्त क्रीडा गृह, एक किलोमीटरची गोलाकर चलत मार्गिका, क्रिकेट खेळपट्टया, टेबल टेनिस, कॅरम खेळाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. शहरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिक या क्रीडासंकुलाचा दैनंदिन आपल्या खेळविषयक उपक्रमांसाठी उपयोग करतात. प्रेक्षक गॅलरी याठिकाणी बांधण्यात आली आहे. शासकीय, खासगी, पालिकेच्या विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा या क्रीडांगणात घेतल्या जातात.

वीस वर्षापूर्वी या क्रीडासंकुलात व्यापारी गाळे उभारणीच्या नावाखाली पालिकेने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्वावर माॅल उभारणीचे काम केले. या भूखंडाची नियंत्रक सक्षम संस्था एमआयडीसी असताना पालिकेने एमआयडीसीच्या बांधकाम परवानग्या न घेता या भूखंडावर वाणिज्य बांधकाम केले. या बांधकामाच्या बदल्यात सुरूवातील ३५ कोटी, त्यानंतर १५ कोटी आणि अलीकडे १२ कोटी रूपये भरण्याचे आदेश एमआयडीसीने पालिकेला बजावले होते. त्याशिवाय वाणिज्य बांधकामाचे बांधकाम आराखडे मंजूर न करण्याचे पालिकेला सूचित केले होते. हा विषय नंतर लालफितीत अडकला. या माॅल विरुध्द प्राचार्य दिवंगत सुरेंद्र बाजपेयी, लीना मॅथ्यू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी लढा उभारला होता. मागील अनेक वर्षात क्रीडासंकुलाच्या प्रशस्त जागेत आखीव रेखीव खेळांची मैदाने विकसित करण्यात आली नाहीत. त्याला नवे रूप देण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे.

नवीन रूप

दोन टप्प्यामध्ये क्रीडासंकुलाचा विकास केला जाणार आहे. एकूण १७ विविध खेळांची मैदाने, सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. ज्येष्ठ वास्तुविशारद शशी प्रभू यांच्या संकल्पनेतून क्रीडासंकुल विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात क्रीडासंकुलाचे पोहच रस्ते, तरण तलाव, क्रिकेट, खोखो, कबड्डी, खेळपट्टया, चलत मार्गिका, मैदानाचा परिघ परिसर विकसित केला जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले. डोंबिवलीत अलीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी क्रीडासंकुल विकासासाठी ४० कोटी दिल्याचे सूतोवाच केले होते.

सावळाराम महाराज क्रीडासंकुल विकासासाठी एमआयडीसीकडून निधी मंजूर झाला आहे. या निधीतून दोन टप्प्यात क्रीडासंकुल विकासाची कामे केली जाणार आहेत. आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने ही कामे सुरू केली जातील. रोहिणी लोकरे कार्यकारी अभियंता, स्मार्ट सिटी प्रकल्प.

Story img Loader