लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने समुह विकासाचा बृहत आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला येत्या आठ दिवसात अंतिम रुप येईल. डोंबिवलीतील आयरे आणि कल्याण मधील कोळसेवाडी हे दोन भाग केंद्रीत करुन विकासाचा आराखडा अंतीम केला जाईल. आवश्यक मंजुरी आणि ठेकेदार नियुक्तीनंतर या कामांना प्रारंभ होईल, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी शुक्रवारी येथे माध्यमांना दिली.
शहरांमधील सर्वाधिक चाळी, जुन्या इमारतींचे समुह असलेले भाग प्रशासनाने समुह विकासासाठी निवडले आहेत. मुख्य लक्ष आयरे, कोळसेवाडी भागांवर केंद्रीत केले जाणार आहे. डोंबिवलीतल दत्तनगर भागाचाही अशाच पध्दतीने विकास केला जाईल, असे आयुक्त डाॅ. दांगडे यांनी स्पष्ट केले. ठाणे पालिका हद्दीतील किसननगर भागात समुह विकासाचा शुभारंभ झाल्यानंतर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ही योजना शासनाने पालिकेला राबविण्याची सूचना करावी, अशा मागण्या नागरिकांकडून शासनस्तरावर केल्या जात आहेत.
हेही वाचा… डोंबिवलीत बेकायदा बांधकामांच्या विरुद्ध निषेध; आंदोलनाचा १००० वा दिवस; आझाद मैदानात उपोषण सुरू
मागील चार ते पाच वर्षापूर्वी कल्याण मधील माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी कल्याण, डोंबिवली शहरांचा कायापालट करण्यासाठी, या शहरांमधील बकालपण कमी करण्यासाठी समुह विकास योजना राबविण्याची मागणी शासनाकडे केली आहे. पालिकेने तसे ठराव करुन शासनाकडे पाठविले आहेत. पालिकेने समुह विकासाचा बृहत आराखडा तयार केल्याने जुन्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आपल्या परिसराचा विकास होईल अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कचरा प्रकल्प
आधारवाडी येथील कचराभूमीवरील कचऱ्याचा डोंगर कमी करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी निवीदा प्रक्रिया केली आहे. आधारवाडी-दुर्गाडी ते मोठागाव वळण रस्त्यासाठी कचराभूमीवरील कचऱ्याचा एक तृतीयांश डोंगर येत्या वर्षभरात कमी केला जाईल. उर्वरित दोन तृतीयांश भाग त्यानंतरच्या दीड वर्षात काढून टाकला जाईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
ई ऑफिस
हस्त पध्दतीने नस्ती हाताळण्याची प्रशासनातील पध्दती बंद करुन ती ई ऑफिस प्रणालीतून सुरू करण्यात आली आहे. अशाप्रकारची पध्दती अंमलात आणणारी कडोंमपा ही देशातील पहिली महापालिका आहे. यामुळे प्रशासनाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक होणार आहे. महिनाभर प्रायोगिक तत्वावर असलेल्या या पध्दतीमधील त्रृटी दूर करुन ती प्रभावीपणे अंमलात आणली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
हिमोफिलीय, थायलेसिमायाच्या रुग्णांना पालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. दिव्यांगांसाठी कल्याणप्रमाणे डोंबिवलीतही फिजिओथेरीपी केंद्र सुरू केले जाणार आहे. मानसिक समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि संवाद धर्तीवर एक समुपदेशन केंद्र कल्याणमध्ये सुरू केले जाणार आहे, असे आयुक्त डाॅ. दांगडे यांनी सांगितले.