कल्याण : कल्याण पूर्व कोळसेवाडीतील शक्तिधाम या पालिकेच्या इमारतीत अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असे प्रसूतीगृह कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. कल्याण पूर्वेत अशाप्रकारचे हे पालिकेचे पहिलेच प्रसूतीगृह आहे. मागील अनेक वर्षापासून कल्याण पूर्वेत प्रसूतीगृह सुरू करण्याची मागणी नागरिक पालिकेकडे करीत होते. त्यांची मागणी आता पुर्ण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण पूर्व भागात कल्याण डोंबिवली पालिकेचे प्रसूतीगृह नसल्याने गर्भवती महिलांना पहिल्या दिवसाच्या नोंदणीपासून ते प्रसुतीपर्यंत कल्याण पश्चिमेत पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय सुरूवातील जावे लागत होते. त्यानंतर वसंत व्हॅली येथील प्रसूतीगृहात जावे लागत होते. कल्याण पूर्वेतील वाढत्या वस्तीचा विचार करून कल्याण पूर्वेत पालिकेने प्रसूतीगृह सुरू करावे अशी मागणी माजी आमदार गणपत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम आणि इतर नागरिक करित होते.

हेही वाचा…‘मंदिरावर हल्ला झाला’! ‘त्या’ क्रमांकावर संदेश आल्याने पोलिसांची धावपळ, प्रत्यक्षात…

कोळसेवाडीमध्ये पालिकेला शक्तिधाम ही बांधिव इमारत विकासकाकडून सर्वसमावेशक आरक्षणाखाली मिळाली आहे. ही जागा सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित आहे. कल्याण पूर्वेतील प्रसूतीगृहाची वाढती गरज विचारात घेऊन तीन वर्षापूर्वी तत्कालीन पालिका आयुक्तांनी या सांस्कृतिक भवनाच्या जागेत प्रसूतीगृहाची उभारणी करण्यास परवानगी दिली. सांस्कृतिक भवनाचा आरक्षण बदलासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. या इमारतीत रात्रीच्या वेळेत मद्यपी, गर्दुल्ले तळ ठोकत होते. पालिकेने या वास्तुचा वापर सुरू करावा यासाठी नागरिकांनी तगादा लावला होता. शक्तिधाममधील प्रसूतीगृह गेल्या आठवड्यापासून पालिकेने सुरू केले.
सुसज्ज प्रसूतीगृह

शक्तिधाम प्रसूतीगृहात सद्यस्थितीत ३० खाटांची येथे व्यवस्था करण्यात आली आहे. बाह्य रुग्ण विभाग आणि आंतर रुग्ण दाखल विभाग सुरू करण्यात आले आहेत. डाॅक्टर, परिचारिका आणि इतर सेवक वर्ग येथे वैद्यकीय आरोग्य विभागाने नियुक्त केला आहे. शासनाच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ महिलांना येथे देण्यात येणार आहे. प्रयोगशाळा, सोनोग्राफी केंद्र येथे आहे. हे प्रसूतीगृह २४ तास सुरू असणार आहे. अशाच पध्दतीने टिटवाळा येथे रुक्मिणीबाई प्लाझा येथे दीड वर्षापासून प्रसूतीगृह चालविले जात आहे.

हेही वाचा…थंडी वाढताच अंड्याच्या दरात मोठी वाढ, थंडी आणि दरवाढीचा संबंध काय?

कल्याण पूर्वेतील शक्तिधाममधील प्रसूतीगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी हे केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. आता या भागातील गर्भवती महिलांना स्थानिक पातळीवर उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. डाॅ. दीपा शुक्ल वैद्यकीय आरोग्य अधिकारी.

शक्तिधाम प्रसूतीगृहात अत्याधुनिक सुविधा आहेत. या भागात पालिकेने हे केंद्र सुरू करून या भागातील महिलांची गैरसोय दूर केली आहे. सुलभा गायकवाड आमदार.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipal administration opened modern maternity home in shaktidham kolsevadi sud 02