कल्याण : देखभाल, दुरुस्तीचे काम करायचे असल्याने ठाकुर्ली चोळे गाव येथील तलाव गणपती विसर्जनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने घेतला आहे. माघी गणेशोत्सव सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने गणेश भक्त, राजकीय मंडळींकडून प्रशासनाच्या या निर्णयावर टीका केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली, ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता, सारस्वत काॅलनी, पेंडसेनगर परिसरातील बहुतांशी भाविक गणपती विसर्जन, नवरात्रोत्सव आणि इतर उत्सव काळातील विसर्जनासाठी ठाकुर्लीतील चोळेगाव येथील तलावावर येतात. हा तलाव पालिकेने यापूर्वीच सुशोभित केला आहे. विसर्जनासाठी हे ठिकाण सुरक्षित असल्याने बहुतांशी भाविक चोळे गाव तलावाला प्राधान्य देतात. माघी गणेशोत्सव शनिवारपासून सुरू झाला. भाविक दीड दिवस, पाच दिवस गणपतीचे पूजन करून मग गणपतीचे विसर्जन करतात.

पालिकेने गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला हा तलाव गणपती विसर्जनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे जाहीर करून भाविकांची गैरसोय केली आहे, अशी टीका गणेशभक्तांकडून केली जात आहे. चोळेगाव तलाव विसर्जनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने या भागातील गणेश भक्तांना कचोरे येथे रेल्वे मार्ग ओलांडून खाडी किनारी, एमआयडीसी तलाव किंवा डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, मोठागाव भागातील खाडी किनारच्या विसर्जन घाटावर जावे लागणार आहे.

दुरुस्तीचे काम

पालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत चोळे तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू आहे. या कामांतर्गत तलावात साचलेला गाळ बाहेर काढणे, तलावा भोवतालची सुरक्षा भिंत दुरुस्त करणे, पदपथ तयार करणे, तलावाच्या बाजुला कायमस्वरुपी कृत्रिम तलावाची उभारणी करणे ही कामे केली जाणार आहेत. ही कामे येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे, अशी माहिती पालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे, उपअभियंता शिवप्रसाद मुराई यांनी दिली आहे.

दीपेश म्हात्रे यांची टीका

माघी गणेशोत्सवाचे आगमन होत असताना हिंदुत्ववादी राज्य सरकारमधील कल्याण डोंबिवली पालिकेने ठाकुर्ली चोळे येथील तलावाच्या दुरुस्तीच्या कामाचे अचानक आदेश काढले आहेत. यामुळे गणेशभक्तांची गैरसोय होईल याचाही विचार केला नाही. कृत्रिम तलावांची येथे सुविधा नाही. गणेशभक्तांची माघी गणेशोत्सवात गैरसोय करण्याची प्रशासनाची भूमिका चुकीची आहे.

कर्तव्यदक्ष आयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांची मोठी फौज असा जामानिमा प्रशासनात लोकसेवेसाठी तत्पर असताना एकाही अधिकाऱ्याला आपण चोळेगाव तलाव दुरुस्तीचे काम माघी गणेशोत्सवात हाती घेऊन भक्तांची गैरसोय करत आहोत, असे वाटले नाही. विशेष म्हणजे याठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा निर्माण करण्याचे कोणा अधिकाऱ्याला सुचले नाही. हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या सरकार, प्रशासनाने गणेश भक्तांची अडचण केली आहे. हा बेजबाबदारपणा नव्हे तर श्रध्देवरील अन्यायाची परिसीमा आहे, अशी टीका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.