कल्याण : विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेतील गैरकृत्य रोखणे, शाळेची सुरक्षितता या सर्व बाबींचा विचार करून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिकेच्या कल्याण, डोंबिवली शहरातील ६१ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

बदलापूर येथील एका शाळेत मागील वर्षी दोन बालिकांवर लैंगिक अत्याचाराची घटना शाळेतील सेवकाकडून झाल्यानंतर या प्रकाराने राज्य हादरले होते. या गैरकृत्याविषयी सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. शासनाने या प्रकरणाची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गंभीर दखल घेऊन राज्यातील सर्व शासकीय, खासगी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश शाळा नियंत्रक संस्था, प्रशासनांना दिले होते.

हेही वाचा…कल्याण डोंबिवली पालिकेतील अनुकंपा तत्वावरील ८८ कामगारांची प्रारूप यादी प्रसिध्द, मागील १५ वर्षातील अनुकंपाची प्रकरणे मार्गी

या आदेशाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पालिका हद्दीतील पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे पालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या आवश्यक प्रशासकीय मंजुऱ्या, निधीची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले आहे.

नियमित कॅमेरे तपासणी

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर या कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष (माॅनिटर) मुख्याध्यापक यांच्या दालनात असणार आहे. ते दालनात बसून शाळा सुरू झाल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत शाळेत होत असलेल्या हालचाली या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहणार आहेत. शाळेतील सीसीटीव्ही चित्रीकरणाची नियमित तपासणी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक महिला, पुरूष शिक्षक यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. सीसीटीव्ही चित्रण तपासताना त्यात काही आक्षेपार्ह आढळून आले तर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे. ही माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. आठवड्यातून किमान तीन वेळा सीसीटीव्ही चित्रण तपासण्याचे बंधन शाळेवर ठेवण्यात आले आहे. आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहोत याची जाणीव विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून करून देण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यात एक स्वयंशिस्त निर्माण होण्यात यामुळे साहाय्य होईल, असे कार्यकारी अभियंता भागवत यांनी सांगितले.

हेही वाचा…ठाण्यात बांगलादेशींचे तळ ? वर्षभरात ६७ बांगलादेशी अटक

विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेचा विचार करून कल्याण डोंबिवली पालिकेच्या ६१ शाळांमध्ये शासन आदेशाप्रमाणे पालिका प्रशासनाने ५०२ कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली जात आहे. पुढील महिन्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण झालेले असेल. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे पूर्ण नियंत्रण शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यपकांवर असणार आहे. प्रशांत भागवत कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग.

Story img Loader