कल्याण डोंबिवली पालिकेच्या शहर अभियंता पदी अर्जुन अहिरे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. ते ठाणे महापालिकेत अतिरिक्त नगर अभियंता म्हणून काम पाहत होते. शुक्रवारी सकाळी अर्जुन अहिरे यांनी मावळत्या शहर अभियंता सपना कोळी यांच्याकडून पदभार स्वीकारला.कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा कशा मिळतील याकडे आपले पहिले लक्ष असेल. विकास कामे तत्परतेने पूर्ण करण्याला आपले प्रथम प्राधान्य असेल, अशी प्रतिक्रिया पदभार स्वीकारल्या नंतर शहर अभियंता अहिरे यांनी दिली. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत अनेक नवीन प्रकल्प सुरू आहेत. काही प्रस्तावित आहेत. शासनाच्या योजना येथे सुरू आहेत. ही सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न असतील. यासाठी पालिकेचा अभियंता वर्ग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आयुक्त यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा भागशाळा मैदानात वाहन कर्ज मेळावा
पालिका हद्दीतील आरोग्य केंद्र, रखडलेले पूल प्रकल्प गतिमानतेने पूर्ण करुन नागरिकांना उपलब्ध करुन दिले. करोना महासाथ काळात करोना काळजी केंद्र उभारणे, रुग्णांना तत्पर सेवा देण्यासाठी उपाययोजना करण्याची कामे प्राधान्याने केली. आंबिवली येथे निसर्ग उद्यान विकसित करण्याची संधी मिळाली. अशा अनेक कामांमुळे एक समाधान आहे, असे मावळत्या शहर अभियंता कोळी यांनी सांगितले.
हेही वाचा >>>ठाणे : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस ; विजेच्या कडकडाटासह जोरादार पावसाची हजेरी
कोळी यांच्या प्रतिनियुक्तीला पुढील महिन्यात चार वर्ष पूर्ण झाली असती. कल्याण डोंबिवलीतील शहरांची दुरवस्था, खड्डे या विषयांवरुन गेले दोन वर्ष त्या नगरसेवक, नागरिकांच्या सर्वाधिक टीकेच्या धनी झाल्या. यावेळी तर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला शहर अभियंता कोळी यांचा संथगती कारभारच जबाबदार होता, असे अभियंते सांगत होते. पावसाळ्यापूर्वीची खड्डे भरणीची कामे जून पूर्वी करणे आवश्यक असताना या कामाच्या निविदा प्रक्रिया जुलैमध्ये सुरू करण्यात आल्या. त्यामुळे पालिकेचे खड्डे भरणीचे नियोजन पूर्ण चुकले. त्याचे चटके आता खड्डे, रस्ते दुरवस्थेवरुन नागरिकांना बसत आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी बांधकामाच्या विभागाच्या प्रमुख म्हणून कोळी याच टीकेच्या धनी झाल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण हे कोळी यांच्या कामांविषयी तीव्र नाराज होते. वेळोवेळी त्यांनी ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे.