कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारी म्हणून शासनाने मंगळवारी बदली केली. दीड वर्षाच्या कालावधीत डाॅ. जाखड यांनी प्रशासकीय कामात शिस्त आणण्यात, पालिकेतील कर्मचाऱ्यांचे पदोन्नत्ती, अनुकंपा, वारसा हक्क भरतीचे प्रश्न मार्गी लावण्यात महत्वाची भूमिका बजावली.
प्रशासकीय कामातील कर्तव्यात कसूरपणा करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना त्यांनी वेळीच खडेबोल सुनावले. थेट निलंबनाची कारवाई केली. सतरा महिन्याच्या कालावधीत आयुक्त डाॅ. जाखड यांनी प्रशासनावर चांगली पकड बसवली होती. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर होता. पालिकेचा चालू वर्षीचा अर्थसंकल्प मांडताना पालिकेची तिजोरी पाहून त्यांनी फार मोठ्या विकास प्रकल्पांच्या घोषणा केल्या नव्हत्या. महापालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांचा प्राधान्यक्रम राहीला होता. राजकीय रेट्यामुळे त्यांच्या काळात अनेक महत्वाचे प्रकल्प कल्याण, डोंबिवली शहरात सुरू करण्यात आले. मात्र यातील बहुसंख्य प्रकल्पांना म्हणावा तसा वेग मिळालेला नाही.
आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डाॅ. इंदुराणी जाखड यांनी आक्रमकपणे प्रशासकीय कामकाज सुरू केले होते. त्यांच्या कार्यकाळात काही रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत होती. बेसुमार बेकायदा बांधकामांमुळे कल्याण, डोंबिवली शहरांना उकीरडा होऊ लागला आहे. जाखड यांच्या कार्यकाळात मोठया प्रमाणावर बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यात आली. असे असले तरी अशा बांधकामांना पुर्णपणे आळा घालणे त्यांनाही जमले नाही. महापालिकेचे उत्पन्न वाढायला हवे यासाठी त्यांनी मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेतील कामकाजावर पुर्ण पकड आहे. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना जाखड यांची या महापालिकेत आयुक्तपदी नियुक्ती झाली. प्रशासकीय सेवेची शिस्तप्रिय कार्यपध्दतीची चुणूक त्यांनी आपल्या कामकाजातून दाखविण्यास सुरूवात केली होती. महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील राजकारण याविषयी त्या सतर्क होत्या. कल्याण डोंबिवली शहरासाठी प्रथमच एक भारतीय प्रशासकीय सेवेतील महिला अधिकारी आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
पालघर जिल्ह्याचे आव्हान
पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके निवृत्त झाल्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पालघर जिल्ह्यात येत्या काळात वाढवण बंदरासारखे मोठे प्रकल्प उभे रहाणार आहेत. याशिवाय मोठया उद्योग समुहांनी या भागाकडे आपले लक्ष वळविले आहे. त्यामुळे जमिन संपादनासारखे महत्वाचे विषय मार्गी लावण्याचे मोठे आव्हान या जिल्ह्यातील प्रशासकीय प्रमुखाकडे असणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात थेट सनदी सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती केली जावी असा आग्रह धरला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाखड यांची याठिकाणी नियुक्ती करत आव्हानात्मक जबाबदारी त्यांना दिली आहे.