कल्याण : ३१ मार्च आर्थिक वर्षाखेरमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेने आपली नागरी सुविधा केंद्रे कर भरणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार, रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणनेही आपली वीज देयक केंद्रे सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदार, पाणीपट्टी देयक थकबाकीदार यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत अभय योजना पालिकेने लागू केली आहे. थकबाकीदार नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी त्यांची थकित रकमेची कर, पाणीपट्टीची देयके भरणा केली तर देयकातील शंभर टक्के दंड व व्याजाची शास्ती माफ होणार आहे. नागरिकांना या अभय योजनेचा अधिकाधिक लाभ घेता यावा या उद्देशातून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही ३१ मार्चपर्यंत पालिकेची दहा प्रभागांमधील आणि मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

थकबाकीदार नागरिकांनी पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात येऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून कर भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा. वेळेत थकित रकमेचा भरणा केला नाहीतर १ एप्रिलपासून दरमहा दोन टक्के दंड व व्याजाची आकारणी लागू होणार आहे. ही आकारणी टाळण्यासाठी थकबाकीदार करदात्यांनी ३१ मार्चपूर्वी कर, पाणी पट्टी देयक भरण्याचे आवाहन उपायुक्त देशपांडे यांनी केले आहे.

वर्षाखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आपली वीज देयक भरणा केंद्रे शनिवार, रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वीज ग्राहकांनी आपल्या चालू वीज देयकासह थकित वीज देयक रकमेचा ३१ मार्चपूर्वी भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या कल्याण विभागाने केले आहे.