कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्व जे प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील पथकप्रमुख भगवान काळू पाटील (रा. वडवली गाव) यांना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी बुधवारी पालिका सेवेतून निलंबित केले. गेल्या आठवड्यात जे प्रभागातील फेरीवाल्यांच्या मध्यस्थांकडून फेरीवाल्यांवर कारवाई न करण्यासाठी भगवान पाटील एका मध्यस्थाकडून फेरीवाल्याकडून मिळालेला हप्ता स्वीकारताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले होते.

पथकप्रमुख भगवान काळू पाटील फेरीवाल्यांची पाठराखण करण्यासाठी आणि जे फेरीवाले हप्ता देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एका मध्यस्थाकडून पैसे स्वीकारत असल्याची दृश्यध्वनीचित्रफित समाज माध्यमांत प्रसारित झाली होती. या दृश्यध्वनी चित्रफितीची आयुक्त डाॅ. जाखड, अतिरिक्त आयुक्त गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी गंभीर दखल घेतली होती.

सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी पाटील यांचे काही कारनामे उघड करून त्यांना आणि त्यांच्या वरिष्ठांना निलंबित करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. घडल्या प्रकाराबद्दल सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून पथकप्रमुख भगवान पाटील यांना खुलासा दाखल करण्याची नोटीस बजावली होती. परंतु, पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे दाखल केलेला खुलासा विपर्यास्त होता. प्रशासनाने पाटील यांचा खुलासा अमान्य केला.

दृश्यध्वनीचित्रफितीमध्ये भगवान पाटील हे किती आणलेत. मध्यस्थाने पंधराशे रूपये आहेत, असे म्हटले आहे. पैसे कमी पडले म्हणून आपण काही पैसे यात टाकले आहेत. काही फेरीवाल्यांनी पैसे दिले नाहीत. त्यांच काय ते बघून घ्या, असे मध्यस्थ पाटील यांना कारवाईच्या विचारातून सांगतात, असे दृश्यध्वनी चित्रफितीमध्ये संभाषण आहे. पालिकेच्या जे प्रभागाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाटील यांनी हे पैसे स्वीकारले होते.

पाटील यांनी कार्यालयीन परिसरात एका इसमाकडून पैसे स्वीकारले. यामुळे त्यांच्या सचोटीबद्दल शंका निर्माण होते. तसेच त्यांनी पालिकेची प्रतीमा मलीन केल्याने प्रशासनाने त्यांना तात्काळ निलंबित केले आहे. पाटील यांची याप्रकरणी विभागीय चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आपण कोणतेही गैरकृत्य केले नाही. राजकीय पाठबळामुळे आपल्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई होणार नाही, अशी भूमिका घडल्या प्रकारानंतर आपल्या समपदस्थ कामगारांसोबत मांडण्यास त्यांनी सुरूवात केली होती.

पाटील यांच्या फेरीवाला हटाव पथकातील कार्यपध्दतीबद्दल साहाय्यक आयुक्त, फेरीवाला पथकातील कामगार तीव्र नाराज होते. राजकीय वजन वापरून ते फेरीवाला हटाव पथकात सक्रिय राहायचे. अतिशय आक्रमक स्वभाव असल्याने इतर अधिकारी, कामगार त्यांच्या वाटेला जात नव्हते, असे कामगारांच्या चर्चेतून समजते. डोंबिवली पूर्व फ प्रभागात असताना पाटील यांनी फेरीवाल्यांना हटविण्यापेक्षा त्यांची पाठराखण करण्याचे धोरण स्वीकारले होते. तोच प्रकार त्यांनी जे प्रभागात सुरू केला होता.

Story img Loader