कल्याण : महसुली उत्पन्नाचे तोकडे स्त्रोत, त्यात घटलेले महसुली उत्पन्न. शासनाकडून किती निधी मिळेल याविषयी असलेली सांशकता. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरात कोणत्याही मोठ्या विकास प्रकल्पांच्या घोषणा न करता, सुरू असलेली आहे तीच विकास कामे पूर्ण करण्याचा आणि नागरिकांना अधिकाधिक गतिमान प्रशासकीय सुविधा देण्यावर भर देणारा अर्थसंकल्प गुरुवारी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सादर केला.

महसुली उत्पन्न, शासनाकडून मिळणारा निधी यांची सांगड घालून आणि सुधारित अंदाज वर्तवून नागरिकांना विकास कामांचा फार मोठा बागुलबुवा न दाखविता वास्तवदर्शी, थोडा फुगवटा दर्शविणारा यावेळचा अर्थसंकल्प आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी प्रशासनाचा आणि परिवहन व्यवस्थापक डाॅ. विजयकुमार द्वासे यांनी परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना सादर केला. पालिकेत नगरसेवक राजवट नसल्याने प्रशासन, परिवहनकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याचा ठराव पालिका सचिव किशोर शेळके यांनी मांडला. प्रशासक म्हणून आयुक्तांनी या दोन्ही अर्थसंकल्पांना मंजुरी दिली.

सन २०२४-२५ च्या आरंभीच्या शिल्लकेसह एकूण दोन हजार ६४२ कोटी ६९ लाख जमा आणि एक हजार ९१५ कोटी ६० लाख खर्चाचे सन २०२४-२५ चे सुधारित अंदाज, तसेच रक्कम ७२७ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह सन २०२५-२६ चे तीन हजार ३६१ कोटी २५ लाख जमा आणि तीन हजार ३६१ कोटी खर्चाचे आणि रक्कम २५ लाख शिल्लकीचे अंदाजपत्रक आहे.

वस्तुस्थितीचा विचार करून चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. गतिमान प्रशासनाचा विचार करून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढीसाठी आगामी वर्षात प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. यासाठी आवश्यक तेवढ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे आयुक्त डाॅ. जाखड यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. सन २०२४-२५ मध्ये प्रशासनाने एक हजार ७५१ कोटी ६४ लाख महसुली उत्पन्न जमेचा अंंदाज धरला होता. वर्षाअखेरीस सुधारित अंदाजाप्रमाणे एक कोटी ३७७ कोटी ९३ लाख महसूल जमा झाला आहे. त्यामुळे यावर्षी महसुली उत्पन्नात ३७३ कोटीची घट आहे. आगामी वर्षासाठी एक हजार ८४६ कोटी ३४ लाख महसुली उत्पन्न जमेचा अंदाज धरण्यात आला आहे.

मालमत्ता कर, विशेष अधिनियम वसुली हे पालिकेच्या महसुली उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहेत. २०२४-२५ मध्ये ७०० कोटी मालमत्ता कराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ५०० कोटीचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे या कराच्या माध्यमातून तिजोरीत २१४ कोटीची तूट आली आहे. कर थकबाकीदारांसाठी पालिकेकडून मागील चार ते पाच महिन्यात अभय योजना राबविण्यात आली. या योजनेतून सुमारे ५९ कोटी महसूल मिळाला. तरीही पालिकेची तिजोरी काठोकाठ भरली नाही. नगररचना विभागाच्या माध्यमातून विकास अधिभार जमा होतो. विशेष अधिनियमाखालील या वसुलीचा २०२४-२५ चा लक्ष्यांक ६६१ कोटी होता. प्रत्यक्षात ४४० कोटी जमा झाले आहेत. त्यामुळे २२१ कोटीची तूट या वसुलीत आली आहे. महसुली उत्पन्न घटले असले तरी २०२५-२६ च्या या दोन्ही महसुली उत्पन्नात १०० कोटीची वाढ करण्यात आली आहे.

पाणीपट्टीचा ९० कोटीचा लक्ष्यांक ओलांडून प्रथमच पाणीपट्टीची शंभर टक्के म्हणजे ९१ कोटी वसुली झाली आहे. एकूण महसूल जमेचा अंदाज दोन हजार १३२ कोटी होता, प्रत्यक्षात एक हजार ५८६ कोटी जमा झाले. त्यामुळे एकूण महसुली जमेत ५४५ कोटीची तूट आली आहे. आगामी वर्षासाठी दोन हजार १६१ कोटी महसुली वसुलीचा लक्ष्यांक ठेवण्यात आला आहे. शासन अनुदानाची एक हजार ६४१ कोटीची रक्कम अपेक्षित होती. येत्या आर्थिक वर्षात ही रक्कम एक हजार ३५ कोटी प्रस्तावित करण्यात आली आहे.

शासन अनुदानातून एकूण ५३५ कोटीची कामे प्रस्तावित होती. प्रत्यक्षात २८६ कोटी खर्च झाले. आगामी वर्षासाठी या निधीतून ६४९ कोटीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. एकूण महसुली व भांडवली जमा दोन हजार ५३५ कोटी प्रस्तावित होते. प्रत्यक्षात एक हजार ८५४ कोटी जमा झाले. चालू वर्षात दोन हजार ६३४ कोटीचा लक्ष्यांक ठेवण्यात आला आहे. एकूण महसुली व भांडवली जमा तीन हजार १८२ कोटी, प्रत्यक्षात एक हजार ९१५ कोटी खर्च झाले. आगामी वर्षासाठी तीन हजार ३६१ कोटीचा अंदाज बांधण्यात आला आहे.

वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. पालिका हद्दीतील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. महसुली उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनधिकृत बांधकामे, नळ जोडण्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येत आहे. मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यावर भर देणारा आणि कर वाढ नसलेला हा अर्थसंकल्प आहे.

डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त.