कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार आणि परवाना विभागातील लिपिक प्रशांत काशिनाथ धिवर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दीड लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे पालिका हद्दीत मटण विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाचा परवाना अर्ज स्वीकृत करण्यासाठी आणि परवाना हस्तांतरित करण्यासाठी मदत म्हणून बाजार व परवाना विभागातील लिपिक प्रशांत धिवर यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वत:साठी आणि वरिष्ठांसाठी दोन लाख रूपये लाचेची मागणी केली होती. एवढी रक्कम देणे तक्रारदारास शक्य नसल्यामुळे तडजोडी अंती ही रक्कम एक लाख ५० हजार स्वीकारण्याचे लिपिक धिवर यांनी मान्य केले. परवाना अधिकृत असताना बाजार व परवाना विभागातील कर्मचारी आपल्याकडे मोठी लाच मागत असल्याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणी कारवाईत धिवर हे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालिकेत सापळा लावला होता. तक्रारदाराकडून दीड लाख रूपये घेताना लिपिक प्रशांत धिवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणात वरिष्ठांचा उल्लेख झाला असल्याने याप्रकरणाची चौकशी करून पथकाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipal corporation clerk arrested while accepting bribe of rupees one lakh fifty thousand css