कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मागील तीन महिने आक्रमक कर वसुली मोहीम राबवून पालिकेच्या तिजोरीत ४५३ कोटीची भर घातली आहे. सन २०२४-२५ मध्ये मालमत्ता कराचा वसुली लक्ष्यांक ५०० कोटी रूपये होता. त्यामुळे ६७ कोटीने वसुली कमीच झाली आहे.
मागील चार ते पाच महिन्यात पाणीदेयक, मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी राबविलेल्या अभय योजनेच्या माध्यमातून सुमारे साठ कोटीपर्यंत रक्कम जमा झाल्याचे मागील पंधरा दिवसांच्या अभय योजनेतील आकडेवारीवरून समजते. मागील वर्षी लक्ष्यांकापेक्षा सुमारे १०० कोटीने मालमत्ता कराची अधिकची वसुली झाली होती.
मालमत्ता कर हा पालिकेचा मुख्य महसुली उत्पन्न स्त्रोत आहे. मालमत्ता कर वसुली ही लक्ष्यांकाएवढी झाली पाहिजे यासाठी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी मागील सहा महिन्यांपासून मालमत्ता कर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तगादा लावला होता. मालमत्ता, पाणी देयक थकबाकीदारांच्या मालमत्ता, नळ जोडण्या तोडण्याचे आदेश दिले होते. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकीदार कर, पाणी देयक थकबाकी भरणा करत नसेल तर त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाप्रमाणे मागील चार दिवसात पालिकेने ५४ लाखाच्या थकबाकीपोटी दहा प्रभाग हद्दीतील २८ हून अधिक मालमत्ता सील केल्या आहेत. वीसहून अधिक मालमत्ता जप्त करून त्यांच्या लिलाव प्रक्रिया प्रस्तावित आहेत. कारवाई टाळण्यासाठी अनेक थकबाकीदारांना घटनास्थळीच कारवाई पथकाला ऑनलाईन माध्यमातून थकित रकमेचा भरणा केला.गेल्या महिनाभर मालमत्ता कर उपायुक्त स्वाती देशपांडे प्रत्येक प्रभागात जाऊन थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी प्रयत्न करत होत्या. मालमत्ता कर न भरणाऱ्या बँका, आस्थापना यांची कार्यालये सील केली जात होती.
आयुक्त डाॅ. जाखड यांचे कर वसुली मोहिमेकडे बारकाईने लक्ष असल्याने कारवाईचा बडगा टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागातील साहाय्यक आयुक्त प्रशासकीय कामांबरोबर रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून कर वसुलीचे नियोजन करत होते. या आक्रमक कर वसुली मोहिमेमुळे ४५३ कोटीची कर वसुली झाली आहे.
अनेक वर्षाची मालमत्ता कराची थकित रक्कम अधिक प्रमाणात असल्याने ही रक्कम वसुल होत नसल्याने अधिकाऱ्यांची डोकेदुक वाढली आहे. ही वाद्गग्रस्त प्रकरणातील मालमत्ता कर वसुली कधीच होणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. याविषयी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
सर्व्हअर डाऊन
मालमत्ता कर, पाणी देयक थकबाकीदारांनी ३१ मार्च रोजी पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात, ऑनलाइन माध्यमातून कर भरणा करण्याचा प्रयत्न केला. पालिकेचा सर्व्हअर डाऊन असल्यामुळे नागरिकांना कर भरण्यात अडथळे येत होते. नागरी सुविधा केंद्रात एक देयक भरण्यासाठी विलंब लागत असल्याने सुविधा केंद्रात नागरिकांच्या कर भरण्यासाठी लांब रांगा लागल्या होत्या.