कल्याण – पावसाळ्यापूर्वीची नाले, गटार सफाईची कामे आणि तत्सम इतर सर्व प्रकारची कामे ३१ मेच्या आत पूर्ण झाली पाहिजेत. नाले, गटार सफाईचे कामे अतिशय सुक्ष्म पध्दतीने झाली पाहिजेत. नाले सफाईच्या कामाची नुसती बिले काढू नका, तर त्या बिलांसोबत काटेकोरपणे केलेली कामेही दिसली पाहिजेत, अशी तंबी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शुक्रवारच्या बैठकीत दिली.
आयुक्त गोयल यांनी पावसाळ्यापूर्वीची कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्ण झाली पाहिजेत याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावयाची कामे या विषयावर आयुक्तांनी पालिका मुख्यालयात शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयुक्त गोयल हे स्वत उच्चश्रेणीतील स्थापत्य अभियंता आहेत. समपदस्थ, सहकारी अधिकाऱ्यांनी नाले, गटार सफाई, सखल भागातील पाण्याचा निचरा, गाळ काढल्यानंतर त्याची विल्हेवाट याविषयी स्वताहून आवश्यक सूचना करत आहेत.
पावसाळ्यापूर्वीच्या कामांच्या नस्ती विविध विभागात अनेक मंचक, अधिकाऱ्यांसमोर फिरवत न बसता अशा नस्ती एका टेबलला बसवून अधिकाऱ्यांनी तातडीने एका बैठकीत मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांनी करून नस्ती मंजुरीच्या यापूर्वीच्या वेळकाढूपणाला लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे.
नाले, गटारांमधील गाळ बाहेर काढल्यानंतर तो तात्काळ निश्चित केलेल्या ठिकाणी नेऊन टाकण्यात यावा. गाळ, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात यावी. जोपर्यंत नाले, गटारातून गाळ काढून तो वाहनाने योग्य ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावली जात नाही, तोपर्यंत मोजणी पुस्तिकेत (एम. बी. बुक) त्या कामांची कोणत्याही प्रकारे नो्ंद करू नये, अशा सक्त सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या. नालेसफाई, गटार, कचरा सफाईच्या बाबतीत हलगर्जीपणा दिसून आला तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू आहेत, म्हणून नुसती बिले काढू नका, तर ते काटेकोर कामही त्या बिलासोबत दिसले पाहिजे, अशी तंबी आयुक्त गोयल यांनी दिली.
मागील अनेक वर्ष कल्याण डोंबिवली पालिकेत राजकीय पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद असलेले काही ठराविक ठेकेदार नाले, गटार सफाईची कामे करतात. या ठेकेदारांचे नियंत्रक अधिकारीही वर्षानुवर्ष ठराविक अधिकारी आहेत. पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस नाले, गटार सफाईची जुजुबी कामे सुरू करायची. एकदा पाऊस सुरू झाला की निविदेप्रमाणाची कामे पूर्ण न करता अर्धवट कामे करूनही कामांची पूर्ण देयक काढण्याची मागील अनेक वर्षाची पालिकेतील प्रथा आहे. ही प्रथा मोडून काढण्यास आयुक्तांंनी प्रारंभ केला आहे. अभियंत्यांच्या कामकाजावर आयुक्तांचे बारकाईने लक्ष आहे.
पावसाळ्यात कोठेही पाणी तुंबणार नाही यासाठी नाले, गटार सफाईची कामे सुक्ष्म पध्दतीने करण्यावर भर आहे. सखल भागात पाणी तुंबण्याच्या ठिकाणी विशेष पथके स्थापण्यात येणार आहेत. ३१ मे पूर्वी पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
अभिनव गोयल, आयुक्त.