कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्याच्या १० दिवसांच्या कालावधीत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी विविध विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. पालिका हद्दीतील विकास प्रकल्प, पालिकेच्या नागरी सुविधांची पाहणी त्या कोणत्याही पू्र्वसूचनेविना करत आहेत. यामुळे अधिकाऱ्यांची पळापळ होत आहे. सुट्टीच्या दिवशीही आयुक्त जाखड कार्यालयात उपस्थित राहत असल्याने विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील तीन वर्षापू्वी थेट आय. ए. एस. आयुक्त ई. रवींद्रन, पी. वेलरासू यांनी प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या बदल्यानंतर प्रशासनात पुन्हा सुस्तपणा आणि अधिकारी, कर्मचारी सुशेगात होते. गेल्या दीड वर्षाच्या काळात कधी नव्हे एवढे प्रशासन सुस्तावले होते. थेट भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय. ए. एस.) आयुक्त डाॅ. जाखड पालिकेत हजर झाल्यापासून अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त दिसू लागली आहे. स्वत: आयुक्त पावणे दहा वाजता हजर होतात. यापूर्वी अधिकारी पहाणी दौऱ्याच्या नावाखाली दुपारी बारा वाजता कार्यालयात येऊन रात्री नऊ वाजेपर्यंत कार्यालयात कामे करत बसत होते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नव्हती. जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून आपल्या कठोर शिस्तीची चुणूक पहिल्या १० दिवसात दाखवून दिली आहे. सुशेगात कर्मचारी वर्ग आता सकाळी कार्यालयीन वेळ सुरू होण्याच्या अगोदरच कार्यालयात हजर असतो.

हेही वाचा : अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान; मळणी केलेला भात अन् रब्बी हंगामातील लागवड धोक्यात

आढाव बैठकीत अस्वस्थता

रस्ते, स्मार्ट सिटी प्रकल्प, सुरू असलेले विकास प्रकल्प यांची माहिती आयुक्त जाखड या विभागप्रमुखांकडून ऐकून घेतात. या माहितीत काही त्रृटी, चुकीची माहिती मिळत असल्याचे समजले तर मात्र स्ंबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेतात. आयुक्त जाखड यांच्याकडून आढावा बैठकीत कोणत्या क्षणी काही प्रश्न येईल, या भीतीने बैठकी पुर्वीच्या तयारीला कधी नव्हे अधिकारी लागले असल्याचे पालिकेत चित्र आहे.

हेही वाचा : ‘आनंद दिघे साहेबांचा हंटर कुठेय’, मुख्यमंत्र्यांनी विचारले निर्मात्यांना, जुन्या आनंद आश्रमाच्या आठवणीत मुख्यमंत्र्यांसह सगळेच झाले रममाण

सोमवारी सुट्टी असुनही आयुक्तांनी अचानक डोंबिवलीत पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात फेरी मारली. रुग्णालयात त्यांनी विविध विभागांची, रुग्ण सेवेची माहिती घेतली. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे साहाय्यक आयुक्तांना आदेश आहेत.

“अनेक वर्षानंतर शिस्तप्रिय थेट आय. ए. एस. महिला अधिकारी कल्याण डोंंबिवली पालिकेला लाभली आहे. राजकीय मंडळींनी हस्तक्षेप न करता त्यांना विकास कामे मार्गी लावण्यासाठी, शहरांचे बकालपण घालविण्यासाठी मोकळीक द्यावी. किमान तीन वर्ष डाॅ. इंदुराणी जाखड पालिकेत राहतील यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न करावेत.” – लता अरगडे, अध्यक्ष, उपनगरी महिला रेल्वे प्रवासी महासंघ, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipal corporation commissioner ias dr indurani jakhar inspecting public facilities css