कल्याण- अभय योजनेला थकबाकीदार नागरिकांचा मिळणारा वाढणारा प्रतिसाद आणि करदात्या नागरिकांच्या मागणीचा विचार करुन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने अभय योजना आणि मालमत्ता कर भरण्याची मुदत वाढवली आहे.अभय योजना, मालमत्ता कर भरण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी अभय योजनेसाठी १८ ऑगस्ट, नियमित मालमत्ता कर भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे. मालमत्ता कराची अधिक संख्येने वसुली व्हावी. थकीत रकमा थकबाकीदारांनी वेळेत भरणा कराव्यात म्हणून आयुक्त डाॅ. दांगडे यांनी १५ जून ते ३१ जुलैपर्यंत अभय योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार मालमत्ता कर थकबाकीदाराने चालू वर्षाच्या करासह थकबाकीची मागील संपूर्ण रक्कम आणि त्यावरील व्याज (शास्ती) २५ टक्के एक रकमी भरल्यास अशा ग्राहकांना पालिकेने ७५ टक्के दंड-व्याज (शास्ती) माफ करण्याचा निर्णय घेतला होता.
दंड-व्याजाची रक्कम माफ होणार असल्याने १५ जून ते ३१ जुलै कालावधीत कडोंमपा हद्दीतील ३५ हजार ८३५ करदात्यांनी पालिकेच्या योजनेप्रमाणे पालिकेच्या तिजोरीत कर रक्कम भरणा केली. ही रक्कम १६० कोटी ८० लाख रुपये आहे, असे मालमत्ता कर उपायुक्त विनय कुळकर्णी यांनी सांगितले. अभय योजनेला थकबाकीदारांचा वाढता प्रतिसाद असल्याने आयुक्तांनी या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.चालू वर्षाची मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम एक रकमी भरणा करणाऱ्यांना प्रशासन पाच टक्के (रिबेट) देते. या सवलतीचा लाभ ग्राहकांना घेता यावा म्हणून नियमित कर भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. कर भरण्याच्या वाढीव मुदतीचा अधिकाधिक करदात्या नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन, उपायुक्त कुळकर्णी यांनी केले आहे.