कल्याण – विकासकाकडून रोख, सदनिकांच्या स्वरुपात खंडणी घेण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेला कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागातील वाहनचालक कामगार विनोद मनोहर लकेश्री यांना शुक्रवारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी दाखल केलेल्या प्रस्तावरून निलंबित केले.
महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त नियम १९७९ मधील नियम ४(१) प्रमाणे प्रशासनाने कामगार लकेश्री यांच्यावर ही कारवाई केली. पालिकेतून निलंबित होण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रम जाहीरपणे बक्षिसरुपाने पैसे उधळल्याने अनेक कर्मचारी निलंबित झाले होते. त्यामध्ये विनोद यांचाही सहभाग होता. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही त्यांची चार वर्षांपूर्वी चौकशी केली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर पालिकेच्या डोंबिवली विभागीय कायार्लयासमोर भूमाफियांकडून जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातून ते सुदैवाने बचावले होते. डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांशी त्यांचे नाव नेहमीच जोडले जात होते.
हेही वाचा – डोंबिवलीतील बेकायदा राधाई कॉम्प्लेक्सवर हातोडा, दोन दिवसात इमारत भुईसपाट करण्याचे नियोजन
या हल्ल्यानंतर अलीकडे लकेश्री यांनी पोलीस आयुक्तांकडे आपल्या जीवाला काही जणांकडून धोका असल्याची, तसेच एक वाहन आपले नियमित पाठलाग करते अशी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. या तपास प्रक्रियेतून हा खंडणीचा प्रकार उघडकीला आला आहे.
विकासक प्रफुल्ल गोरे यांनी डोंबिवलीत विविध भागात सुरू असलेल्या आपल्या गृहप्रकल्पांच्या तक्रारी कामगार विनोद लकेश्री यांच्यासह वसंत शंभरकर, प्रशांत शिंदे, माहिती कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी पालिका, शासनाकडे केल्या. आपल्या गृहप्रकल्पांची छायाचित्रे समाज माध्यमांमध्ये प्रसारित करून आपली आपल्या गृहप्रकल्पांमध्ये घर खरेदी होणार नाही अशा पद्धतीने आपली कोंडी केली. या तक्रारी मागे घेण्याच्या माध्यमातून आरोपींनी आपल्याकडे रोख ४१ लाख रुपये आणि पाच सदनिका खंडणीरुपाने घेतल्या आहेत, अशी तक्रार ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्याकडे केली होती.
या प्रकरणाचा तपास सुरू होताच, लकेश्री आणि इतर दोन जण फरार झाले. गेल्या वीस दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सकृतदर्शनी सबळ पुरावे असल्याने पोलिसांनी लकेश्री यांच्यासह इतर आरोपींवर विष्णुनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला. या खंडणी प्रकारात पालिका कर्मचारी सहभागी असल्याने पालिकेच्या प्रतीमेला धक्का आणि पालिकेची बदनामी झाल्याने आयुक्त डाॅ. जाखड यांनी सामान्य प्रशासन उपायुक्त गुळवे यांना लकेश्री यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे शुक्रवारी लकेश्री यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले. ही कारवाई म्हणजे अतिक्रमण नियंत्रण, फेरीवाला हटाव पथक, घनकचरा विभागातील कामगारांना मोठा इशारा आहे.
कामगार विनोद लकेश्री यांच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर आयुक्तांनी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त नियमाने निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन काळात त्यांची उपस्थिती पालिका मुख्यालयात राहील. – वंदना गुळवे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.