कडोंमपा आयुक्त ई रविंद्रन यांचा उपाय फोल; स्कायवॉकसह पदपथांच्या जागा अडविल्या
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले वारंवार कारवाई करूनही हटत नाहीत, असे चित्र सध्या दिसू लागले आहे. यामध्ये काही महापालिका कर्मचारी आणि फेरीवाल्यांचे हितसंबंध आहेत. त्यामुळे आयुक्त ई. रवींद्रन यांनी पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेच्या सातही प्रभागांमधील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या मूळच्या ठिकाणापासून अन्य प्रभागांत बदल्या केल्या. फेरीवाले व कर्मचाऱ्यांची ‘आर्थिक’ साखळी तुटल्याने फेरीवाल्यांवर नवनियुक्त कर्मचाऱ्यांकडून जोरदार कारवाई होईल, अशी सामान्यांची अपेक्षा होती, ती फोल ठरली आहे. याउलट डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाच्या ग प्रभागाच्या हद्दीत व कल्याण पश्चिमेतील क प्रभागात रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉक, रस्ते, पदपथावरून चालता येत नाही, अशा पद्धतीने फेरीवाल्यांनी जागा अडवून व्यवसाय सुरू केला आहे.
डोंबिवली पूर्व भागातील रेल्वे स्थानकाचा काही भाग फ प्रभागाच्या अंतर्गत येतो. या प्रभागाच्या हद्दीतील नेहरू रस्ता, फडके रस्ता, चिमणी गल्ली, शिवमार्केट परिसरात सकाळ-संध्याकाळ कर्मचाऱ्यांकडून कारवाई करून फेरीवाल्यांना हटविले जात आहे. त्यामुळे या भागातून हटविण्यात आलेले सगळे फेरीवाले ग प्रभाग हद्दीतील राजाजी रस्ता, उर्सेकरवाडीतील चारही गल्ल्या, पूजा सिनेमागृह परिसर, कामत मेडिकल दुकानासमोरील पदपथ फेरीवाल्यांनी व्यापून टाकला आहे. या भागातील रस्त्यांवर भाजीविक्रेते, चप्पल विक्रेते, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने, पाणीपुरी, वडापाव, नारळ विक्रेते ठाण मांडून बसू लागले आहेत.
दोन दिवसाआड भेट द्या!
कल्याण रेल्वे स्थानक भागातील स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी पुन्हा आपली दुकाने थाटली आहेत. क प्रभागाचे फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी आले की, तेवढय़ा वेळेपुरते स्कायवॉकवरील फेरीवाले चादरीत सामान गुंडाळून आजूबाजूला लपून बसतात आणि हटाव पथक निघून गेले की, पुन्हा ते स्कायवॉकवरील मार्गिका अडवून व्यवसाय सुरू करतात. यामुळे सर्वसामान्यांचे चालणे मुश्किल झाले आहे. फेरीवाल्यांचा हा प्रकार थांबविण्यासाठी आता आयुक्तांनी किमान दोन दिवसाआड कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराला भेट द्यावी, अशी मागणी सामान्यांकडून केली जात आहे.
नगरसेवकही गप्प झाल्याने आश्चर्य
पंधरा दिवसांपूर्वी आयुक्तांनी डोंबिवली पूर्व भागाला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसणार नाही अशा प्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये बदल करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी बदलून पंधरा दिवस उलटले. त्यामुळे फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त होण्यापेक्षा याउलट फेरीवाल्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाची जबाबदारी नव्याने रमाकांत जोशी या ज्येष्ठ कर्मचाऱ्याकडे काही वर्षांनंतर पुन्हा सोपविण्यात आली आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील एक नगरसेवक आयुक्तांकडे सतत फेरीवाल्यांना हटविण्यासाठी तक्रारी करायचा. हाही नगरसेवक आता गप्प झाल्याने, सामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वर्षअखेर जवळ आल्याने कर वसुलीची कामे सुरू आहेत. ती जबाबदारी सांभाळून आपण संध्याकाळी चारपासून फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करण्यास सुरुवात करतो. कर वसुलीचे लक्ष्यांक पूर्ण करणेही महत्त्वाचे असल्याने तिकडे अधिक लक्ष देत आहे. यापुढे ग प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यात येईल.
-रमाकांत जोशी, ग प्रभाग, फेरीवाला हटाव पथकप्रमुख