कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत रस्त्यांवर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ शमविण्यासाठी दोन धूळ शमन वाहने पालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. या दोन्ही वाहनांचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले आहे. बुधवारपासून ही दोन्ही वाहने कल्याण, डोंबिवली शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या धूळ उडणाऱ्या रस्त्यांवर धावतील, अशी माहिती पालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.
पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत सोमवारी सुभाष मैदानावर या दोन्ही वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी घनकचरा उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पालिका हद्दीतील अनेक डांबरी रस्त्यांची सततच्या वर्दळीमुळे चाळण झाली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यांवरून अधिक प्रमाणात धुरळा उडत आहे. या धुळीमुळे रस्त्यांच्या जवळील सोसायट्यांमधील रहिवासी, प्रवासी हैराण आहेत. धुळीमुळे सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढत आहेत. या धुळीत विविध प्रकारचे आरोग्याला हानीकारक कण संचार करतात, असे तज्ज्ञ डाॅक्टरांनी सांगितले.
हेही वाचा : कंटेनर बंद पडल्याने मुंबई नाशिक महामार्गावर कोंडी
शहरातील धुळीचे प्रमाण थोपविणे आणि हवेची गुणवत्ता सुधारण्याचे महत्वपूर्ण काम या दोन्ही वाहनांच्या माध्यमातून केले जाणार आहे, असे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले. टिटवाळा, उंबर्डे, पत्रीपूल, देवीचापाडा, कोपर, आयरे, भोपर, २७ गाव, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, मलंग रस्ता अशा १३५ चौरस किलोमीटर क्षेत्रात पालिकेचा विस्तार आहे. पालिका हद्दीत एकूण सुमारे ४५० किमी लांबीचे रस्ते आहेत. अनेक रस्ते जुन्या पध्दतीने डांबरीकरणातून बांधले आहेत. या रस्त्यांची डागडुजी केली नसल्यामुळे या रस्त्यांवर मातीचे थर आहेत.
डोंबिवलीत मानपाडा रस्ता, एमआयडीसीतील रस्ते, डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भाग, घरडा सर्कल ते सुयोग हाॅटेल रस्ता, घरडा सर्कल ते टाटा नाका, कल्याणमध्ये चिंचपाडा, रेल्वे स्थानक परिसर, मलंग गड रस्ता, विठ्ठलवाडी रस्ता, पश्चिमेत मुरबाड रस्ता, पत्रीपूल ते गोविंदवाडी, दुर्गाडी चौक, पत्रीपूूल ते शिवाजी चौक, लालचौकी मार्गे आधारवाडी रस्ता, आधारवाडी ते गांधारी रस्ता, मोहने, आंबिवली, मांडा टिटवाळा भागातील रस्त्यांवर सर्वाधिक धूळ आहे. या भागातील रस्त्यांवर पालिकेने आठवड्याचे नियोजन करून विविध भागात धूळ शमन वाहन फिरवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा : ठाण्यातील रस्ते कामांसाठी १५ डिसेंबरची मुदत; पावसाळा संपल्याने शहरातील रखडलेल्या रस्ते कामांना सुरूवात
“पालिका परिक्षेत्रातील धुळीवर नियंत्रण आणणे आणि हवेची गुणवत्ता राखणे. कचरामुक्त शहराबरोबर स्वच्छ प्रदूषणमुक्त शहर ठेवणे या उद्देशातून धूळ शमन वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. ही वाहने दररोज शहरातील विविध रस्त्यांवर धूळ शमनाचे काम करतील.” – डाॅ. भाऊसाहेब दांगडे, महापालिका आयुक्त