कल्याण : प्रवासी भाड्यात वाढ नसलेला, शासन आदेशाप्रमाणे महिला, ज्येष्ठांना तिकिट दरात विशेष सवलत देणारा आणि पालिका क्षेत्रात ई बस सेवा प्रभावीपणे सुरू करून शहर प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणस्नेही ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेला कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प गुरुवारी परिवहन व्यवस्थापक डाॅ. विजयकुमार द्वासे यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सभेतच प्रशासक तथा आयुक्तांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली.
सन २०२४-२५ चे सुधारित १५७ कोटी ९७ लाख जमा, १५३ कोटी ३२ लाख खर्च व रुपये चार कोटी ६५ लाख शिल्लकचे अंदाजपत्रक, सन २०२५-२६ चे २२७ कोटी ३८ लाख जमा, २२२ कोटी ५८ लाख खर्च व रुपये ४७९ कोटी ६२ लाख शिल्लकचे अंदाजपत्रक परिवहन उपक्रमाने सादर केले.
नेहमीप्रमाणे तोट्यात असल्याने परिवहन उपक्रमाने केडीएमटीचा गाडा सुरळीत चालण्यासाठी, उपक्रमाची कामे पूर्णत्वास जाण्यासाठी पालिकेकडे अनुदानरूपी अर्थसाहाय्याची मागणी केली आहे. अनेक वर्षापासून परिवहन उपक्रमाचा कारभार पालिका मुख्यालयासमोरील आटोपशीर जागेत सुरू आहे. परिवहनचा वाढता पसारा विचारात घेऊन शहाड येथे परिवहन भवन उभारण्याची कार्यवाही उपक्रमाने सुरू केली आहे. येत्या दोन महिन्यात हे अद्यायावत भवन पूर्ण होणार आहे.
उपक्रमाच्या ताफ्यात १४२ बस आहेत. राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेंतर्गत २०७ विद्युत बस, पीएमई अंतर्गत १०० बस या माध्यमातून आगामी वर्षात प्रवासी वाहतुकीचे परिचालन करण्याचे उपक्रमाचे नियोजन आहे. समांतर बेकायदा वाहतुकीचा परिवहन सेवेला मोठा आर्थिक फटका बसल्याची चिंता अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आली आहे.
प्रवासी, विद्यार्थी सेवेच्या माध्यमातून उपक्रमाला वार्षिक ३३ कोटीचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. कर्तव्यावरील विनातिकीट पोलीस प्रवाशांच्या माध्यमातून एक कोटी २८ लाखाचे येणे उपक्रमाला आहे. परिवहनच्या बस विविध कार्यक्रमांसाठी देण्यात येतात. यामाध्यमातून १० लाख उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. बस थांब्यांवरील जाहिरात माध्यमातून एक कोटी ४९ लाख उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. बस, निवाऱ्यांवरील भाड्यातून चार कोटीचा महसूल अपेक्षित धरण्यात आला आहे. विद्युत बससाठी गणेशघाट, खंबाळपाडा, वाडेघर, वसंत व्हॅली येथील आगार विकसित ३८ कोटीच्या निधीतून विकसित करण्यात येणार आहेत. १५ विद्युत बस ताफ्यात दाखल आहेत.
परिवहन उपक्रमात ५१७ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५८ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. बस दुरुस्ती निगेसाठी १६ कोटी ९७ लाखाची निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. एमएमआर क्षेत्रातील महापालिकांची एकत्रित परिवहन प्राधिकरण निर्माण करून या माध्यमातून प्रवासी सेवा देण्याची कार्यवाही सुरू आहे. यासाठी कर्मचारी वर्ग नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे एमएमआर क्षेत्रातील प्रवासी एकाच बसमधून विविध पालिका हद्दीतील शहरांमध्ये प्रवास करू शकणार आहे.
कल्याण डोंबिवली शहरांचे वाढते नागरीकरण विचारात घेऊन नागरिकरण भागात बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. जुन्या मार्गांमध्ये बदल करून नवीन मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. नवीन बस ताफा उपलब्ध झाल्यावर तत्परतेने प्रवासी देणे उपक्रमाला शक्य होणार आहे. बस थांब्यावरील प्रवाशांना बसची अचूक वेळ, तिचे ठिकाण कळावे म्हणून सुरू केलेली आयटीएमएस सुविधा प्रवाशांना लाभदायी ठरली आहे. उपक्रमाचे भूखंड विकसित करण्याचे नियोजन आहे. ३६ भंगार बस विक्री करून उपक्रमाला ८४ लाखाचा महसूल मिळाला आहे.