कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमातील ३४ भंगार बस आणि इतर तीन लहान वाहने लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून विकून कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाला ८३ लाख ९२ हजार ७५८ रूपयांची रक्कम प्राप्त झाली आहे, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक डाॅ. विजयकुमार व्दासे यांनी दिली आहे.
या आयुर्मान संपलेल्या ३४ भंगार बस १९९७ ते २००० या कालावधीत पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. या बसचे प्रवासी वाहतुकीचे १० वर्षाचे आयुर्मान संपल्याने या सर्व बस कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील गणेशघाट परिवहन आगारात उभ्या करण्यात आल्या होत्या. या बसमुळे परिवहन उपक्रमाला इतर बस उभ्या करण्यासाठी जागा राहत नव्हती. त्यामुळे या बसची डोकेदुखी उपक्रमाच्या मागे होती. २६ जुलै २००५ च्या महापुरात यामधील बहुतांशी बस खराब झाल्या होत्या.
या बस भंगारात देण्यावरून मागील पाच ते सहा वर्षापासून परिवहन समितीत चर्चा सुरू होत्या. या भंगार बस आपल्याच ठेकेदाराला मिळाव्यात म्हणून काही राजकीय मंडळी प्रयत्नशील होती. या बस पालिकेची मालमत्ता असल्याने या बसच्या माध्यमातून पालिका, परिवहन उपक्रमाला फायदा झाला पाहिजे. या बस भंगार म्हणून कवडी मोलाने विकू नका, अशी आक्रमक भूमिका घेत तत्कालीन परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी या बस राजकीय ठेकेदारीतून विकण्याच्या प्रक्रियेला जोरदार विरोध केला होता. याप्रकरणी त्यांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या.
गणेशघाट आगारातील या बसमुळे परिवहन उपक्रमाची जागा व्यापली गेली असल्याने गेल्या वर्षी या बस प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निर्देशानुसार निर्लेखित करण्याचे ठरले. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मान्यतेने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या बसचे मुल्यांकन करून दिले. ३४ बस, तीन लहान वाहने केंद्र शासनाच्या मुंबईतील धातू मोडतोड व्यवहार महामंडळातर्फे निर्लेखित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या भंगार बसची ऑनलाईन लिलाव प्रक्रिया करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ठेकेदारांना या बस पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. तीन टप्प्यात लिलाव पार पाडण्यात आले. अतिशय पारदर्शक पध्दतीने या भंगार बस विक्रीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या बसचे निर्धारित आधारभूत मूल्य ५३ लाख ३८ हजार रुपये निश्चित केले होते.
प्रत्यक्ष लिलावाच्यावेळी या ३७ वाहनांच्या माध्यमातून परिवहन उपक्रमाला ८३ लाख ९२ हजार रूपये रक्कम प्राप्त झाली, असे परिवहन व्यवस्थापक द्वासे यांनी सांगितले. या बस निकाली निघाल्याने या बसमुळे अडलेली जागा इतर बस आणि उपक्रम राबविण्यास मोकळी झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसाच्या सात कलमी कृती आराखड्यांतर्गत स्वच्छता विषयावर या बसचा विषय निकाली काढण्यात आला.