कल्याण : रस्ते कामे करताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले महावितरणचे रोहित्र अडथळा ठरतात. हे रोहित्र तेथून हटवून पर्यायी जागेत नेण्याची सुविधा उपलब्ध नसते. यामुळे रोहित्र आहे त्याच ठिकाणी उन्नत करून बसविण्यात येते आणि त्याला जोडणाऱ्या वाहिन्या भूमिगत करून रस्ते मार्गातील अडथळा दूर करण्याचा पथदर्शी प्रकल्प कल्याण डोंबिवली पालिकेच्या विद्युत विभागाने तयार केला आहे. या प्रकल्पाला महावितरणने मान्यता दिली असून हा राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प आहे, असा दावा कल्याण डोंबिवली पालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कडोंमपा हद्दीत रस्ता रूंदीकरण, काँक्रीटीकरण करताना अनेक ठिकाणी रस्त्यांच्याकडेला महावितरणने परिसराला वीज पुरवठा करण्यासाठी रोहित्रे बसविली आहेत. ही रोहित्रे अडचणीच्या जागी असल्याने ती हटविता येत नाहीत. रोहित्र बसविण्यासाठी खासगी जमीन मालक जागा देत नाहीत. कडोंमपा हद्दीत रस्ता रूंदीकरण करताना रोहित्रांचा रस्ते मार्गातील अडथळा कसा दूर करायचा असा प्रश्न पालिकेच्या विद्युत विभागासमोर होता. त्यावर आता पालिकेने तोडगा काढला आहे. रस्ते मार्गात अडथळे ठरणारे रोहित्र आहे, त्याच भागात उन्नत किंवा भूमिगत करून कसे सुस्थितीत ठेवता येतील, यादृष्टीने गेल्या दीड वर्षापासून पालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि त्यांचे सहकारी एक प्रारूप (माॅडेल) विकसित करत होते. यासाठी महावितरणकडून मार्गदर्शन घेण्यात येत होते.

हेही वाचा : ठाण्यातील १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार; महापालिका आणि खासगी शाळांमधील शिक्षकांचा गौरव

रस्ते बाधित रोहित्र आहे, त्या जागेत, स्थलांतरित न करता उभारण्याचे प्रारूप पालिका विद्युत विभागाने अंतीम केले. जुने रोहित्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे जुने विजेचे रोहित्राचे आधार खांब काढून रोहित्र काँक्रीटच्या एका भक्कम कठड्यावर ठेवले जाते. या रोहित्राकडे उन्नत मार्गाने येणाऱ्या जिवंत वीज वाहिन्या भूमिगत केल्या जातात. उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत अति संरक्षित करून त्या रोहित्राच्या दिशेने नेल्या जातात. रोहित्राला चारही बाजुने संरक्षित लोखंडी जाळी बसविली जाते. रोहित्र उन्नत उंच कठड्यावर ठेवल्याने बाधित रस्ता मोकळा होता. या प्रारूपामुळे शहर सौंदर्यीकरणात भर पडणार आहे, असे भागवत यांनी सांगितले.

हेही वाचा : शहापूरजवळ दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांच्या बसला अपघात, औरंगाबाद येथील १४ शिंदे समर्थक शिवसैनिक जखमी

महावितरणची पसंती

हे प्रारूप महाराष्ट्रात महावितरण वापरू शकते. या प्रारूपाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील, रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारे रोहित्र नवीन प्रारूपाप्रमाणे स्थापित करण्याचे नियोजन शासनाच्या मदतीने केले जाणार आहे, असे भागवत यांनी सांगितले. डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागातील सखारामनगर गृहसंकुल भागात रस्त्याला अडथळा ठरणारे रोहित्र उन्नत करण्यात आले आहे. या कामासाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा : डोंबिवली : काटई-बदलापूर रस्त्याची दुरवस्था; खड्डे, खडी आणि धुळीने चालक, प्रवासी हैराण

“रस्ते बाधित रोहित्र सुयोग्य ठिकाणी स्थापित करून शहर सौंदर्यीकरणात भर घालणारा पथदर्शी प्रकल्प पालिकेच्या विद्युत विभागाने तयार केला आहे. राज्यभर या प्रकल्पाची महावितरणकडून अंमलबजावणी केली जाऊ शकते.” – प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, कडोंमपा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipal corporation removed mahavitaran dp s from road css