कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता पालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्जचे लोखंडी सांगाडे तोडण्याची जोरदार मोहीम प्रभाग स्तरावर साहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून सुरू करण्यात आली आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी ३१ मेपर्यंत पालिका हद्दीतील सर्व बेकायदा होर्डिंग्ज तोडून टाकण्याचे आयुक्त डॉ. जाखड यांचे आदेश आहेत.
घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिका हद्दीत परवानगीधारक होर्डिंग्ज आणि पालिकेच्या परवानग्या न घेता उभारण्यात आलेली लोखंडी सांगाड्याची होर्डिंग्ज यांची तपासणी करण्याचे आदेश प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तसेच, होर्डिंग्ज लावणाऱ्या जाहिरात कंंपन्यांनी आपले होर्डिंग्जविषयक संरचनात्मक प्रमाणपत्र पालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त धर्येशील जाधव यांनी पालिकेला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीला भंगार गोदामांचा विळखा; पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
साहाय्य्क आयुक्तांनी प्रभागस्तरावर केलेल्या सर्वेक्षणा दरम्यान जी होर्डिंग्ज पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता उभारण्यात आली आहेत. ती तातडीने आयुक्त जाखड, उपायुक्त जाधव यांच्या आदेशावरून कटरच्या साहाय्याने कापून भुईसपाट केली जात आहेत. आय प्रभाग हद्दीत व्दारली येथे मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर एका जाहिरात कंपनीने २० बाय ३० भव्य लोखंडी सांगाड्याचे होर्डिंग्ज उभारले होते. साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना हे होर्डिंग्ज बेकायदा असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने या होर्डिंग्चे लोखंडी सांगाडे कापून ते जमीनदोस्त केले. शिळफाटा रस्त्यावरील काटई नाका, गायकर कम्पाऊंड भागात १० बाय १५ आकाराची दोन बेकायदा होर्डिंग्ज जाहिरातदारांनी लावली होती. ही होर्डिग्ज ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने काढून टाकली.
हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील जळीत अमुदान कंपनीच्या मालक, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
कल्याण पूर्वेतील ड प्रभाग हद्दीतील चक्कीनाका भागातील बेकायदा होर्डिंंग्ज या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी तोडकाम पथकाच्या उपस्थितीत तोडून टाकले. या आक्रमक कारवाईमुळे कल्याण डोंबिवली पालिका परिसरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, इमारतींंवर बेकायदा होर्डिंग्ज लावणाऱ्या राजकीय मंडळी, जाहिरात कंपन्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
ठाण्याचा आशीर्वाद
कल्याण डोंबिवली पालिकेतील शिळफाटा आणि इतर वर्दळीच्या चौक, रस्त्यांवर, तसेच, ठाणे पालिका हद्दीत उभारण्यात येत असलेली बहुतांशी बेकायदा होर्डिंग्ज ठाण्यातील एका बड्या लोकप्रतिनिधीच्या सल्लागाराच्या इशाऱ्यावरून लावली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. या होर्डिंंग्जवर पालिकेने कारवाई प्रस्तावित केली की हा सल्लागार पालिका वरिष्ठांना संंपर्क करून संबंधित होर्डिंंग्जवर कारवाई करू नये म्हणून दबाव आणत असल्याच्या खासगीमध्ये काही वरिष्ठ पालिका, काही पोलीस अधिकारी यांच्या तक्रारी आहेत.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत होर्डिंग्ज लावणाऱ्या जाहिरातदार कंपन्यांनी होर्डिंग्जची संरचनात्मक तपासणी करून तो अहवाल मालमत्ता विभागाला ३१ मेपर्यंत दाखल करायचा आहे. पालिका ही अशा सर्व होर्डिंग्जचे सर्वेक्षण करत आहे. जी होर्डिंग्ज बेकायदा आहेत ती तात्काळ तोडली जात आहेत. जे होर्डिंग्ज नियंत्रक संरचनात्मक प्रमाणपत्र देणार नाहीत त्यांची होर्डिंग्ज बेकायदा ठरवून तोडली जातील. धर्येशील जाधव- उपायुक्त, मालमत्ता विभाग.