कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दोन महिन्यापूर्वी सुवर्णा सरोदे या गर्भवती महिलेचा सीझेरिअन शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणाला या महिलेवर उपचार करणाऱ्या मे. एमके फॅसिलिटीज सर्व्हेिस प्रायव्हेट लिमिटेड या बाह्यस्त्रोत संस्थेच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. मीनाक्षी केंद्रे, डाॅ. संगीता पाटील जबाबदार असल्याचा, त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका पालिका उपायुक्त प्रसाद बोरकर समिती, जिल्हा शल्य शल्यचिकित्सक कैलास पवार यांच्या समितीने अहवालात ठेवल्याने डाॅ. केंद्रे, डाॅ. पाटील यांच्या सेवा बाह्यस्त्रोत संस्थेने ५ मार्च रोजी खंडित केल्या आहेत.

पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या गर्भवती महिलेचा फेब्रुवारीमध्ये सीझेरिअन शस्त्रक्रिया केल्यानंतर मृत्यू झाला होता. ही शस्त्रक्रिया नवी मुंबईतील मे. एमके फॅसिलिटिज या बाह्यस्त्रोत संस्थेच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. संगीता पाटील यांनी केली होती. शस्त्रक्रियेनंतर सुवर्णा यांची काळजी घेण्याची जबाबदारी कर्तव्यावरील डाॅक्टर मीनाक्षी केंद्रे, डाॅ. संगीता पाटील यांची होती. या दोन्ही डाॅक्टरांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका दोन्ही समित्यांनी ठेवला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक पवार यांनी याप्रकरणात डाॅक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले. या मृत्यूप्रकरणी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि उपायुक्त प्रसाद बोरकर यांची चौकशी समिती स्थापन केली होती.

कारवाईचा इशारा

सुवर्णा सरोदे या महिलेचा रुग्णालयात प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे. या दिवशी आपल्या बाह्यस्त्रोत संस्थेने उपलब्ध करून दिलेले स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. मीनाक्षी केंद्रे, डाॅ. संगीता पाटील रुग्णालयात उपस्थित नव्हत्या. ही बाब कार्यालयीन शिस्तीला धरून नाही. या दोन्ही डाॅक्टरांच्या सेवा कमी कराव्यात. आपल्या मे. एमके फॅसिलिटिज सर्व्हिस प्रा. लि. कंपनीवर कारवाई का करू नये, अशी तंबी देत याबाबतचा खुलासा देण्याचे आदेश पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांनी मे. एमके या संस्थेला दिले आहेत.

मे. एमके संस्थेचे स्पष्टीकरण

सुवर्णा यांची प्रसूती झाल्यानंतर डाॅ. केंद्रे, डाॅ. पाटील बाह्य रुग्ण विभागात गेल्या. निवासी डाॅक्टरांकडून त्या सुवर्णा यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होत्या. १२ फेब्रुवारी रोजी डाॅ. केंद्रे रुग्णालयात दिवसभर होत्या. डाॅ. पाटील दुपारी पावणे चार वाजता घरी गेल्या. तोपर्यंत सुवर्णाची प्रकृती स्थिर होती. डाॅ. केंद्रे यांच्या मुलाची तब्येत ठीक नसल्याने त्या मोबाईलवरून रुग्णालयात संंपर्कात होत्या. वरिष्ठांनी दुसऱ्या शस्त्रक्रियेच्यावेळी डाॅ. पाटील यांची गरज नाही असे सांगितले. डाॅ. केंद्रे, डाॅ. पाटील यांच्या सेवा थांबविण्या आल्या आहेत. आमच्या संस्थेतील डाॅक्टरांनी आपले कर्तव्य बजावले आहे, असे स्पष्टीकरण मे. एमके फॅसिलिटिज संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष गावडे यांनी पालिका वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मे. एमके फॅसिलिटिज या बाह्यस्त्रोत संस्थेला नोटीस पाठवली आहे. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

प्रसाद बोरकर, उपायुक्त, वैद्यकीय विभाग.