कल्याण-कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यावर्षी मंडप, कमानींचे शुल्क माफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय अग्निशमन शुल्कावर ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बुधवारी दिली.
गणेशोत्सवासंदर्भात पालिकेने स्थायी समिती सभागृहात पालिका, पोलीस, वाहतूक, महावितरण अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यावेळी मंडप उभारणी, कमानींसाठी पालिकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पालिकेने दिलेल्या नियमाने मंडळांनी मंडप उभारणी करायची आहे. तसेच, अग्निशमन शुल्कात ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. पालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात गणेशोत्सव मंडळांना मंडप, कमान उभारणीसाठीच्या परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली.
हेही वाचा >>> राजन विचारेंकडून टेंभीनाक्याविषयी आक्षेपार्ह विधान? दहीहंडीपूर्वी ठाण्यात शिंदे- ठाकरे गटामध्ये राजकीय काला
शाडू मूर्ती
गणेशोत्सव काळात भाविकांनी शाडूच्या मूर्तींचा वापर करावा. तसेच सजावटीसाठी पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर करावा, असे आवाहन घनकचरा उपायुक्त अतुल पाटील यांनी मंडळांना केले. गणेश घाट विसर्जन ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी डोंबिवली, कल्याणमध्ये दोन वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे.
गांधारे येथील गणेश घाटाचा उतार (जेटी) तुटल्यामुळे त्याठिकाणी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे नवीन उतार बांधला जाणार आहे. भाविकांनी कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जनाला प्राधान्य द्यावे. येत्या आठवड्यात पालिका हद्दीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती आयुक्तांनी बैठकीत दिली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त अतुल पाटील, जनसंपर्कप्रमुख संजय जाधव, उपायुक्त वंदना गुळवे, स्वाती देशपांडे, साहाय्यक आयुक्त स्नेहा कर्पे, हेमा मुंबरकर, भारत पवार, वाहतूक विभागाचे साहाय्यक आयु्क्त मंदार धर्माधिकारी उपस्थित होते.