मागील १५ वर्षाच्या काळात अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा प्रभावी अवलंब करुन १८ कोटी युनिटची वीज बचत करणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेला महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचा शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय पालिका रुग्णालयात उच्चतम दर्जेदार उर्जा कार्यक्षम सुविधा देऊन रुग्णसेवेत महत्वपूर्ण कामगिरी केल्याने रुग्णालय संवर्गातही पालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. एकाच वेळी दोन पुरस्कारांसाठी पालिकेची निवड झाल्याने पालिकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा- कल्याण: बिर्ला महाविद्यालय परिसरातून विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला
महाराष्ट्र शासनाच्या मेडा या समन्वयक एजन्सीतर्फे महापालिका विभाग, रुग्णालय विभागात केलेल्या उर्जा बचतीच्या उपाययोजना, राबविलेल्या उपक्रमांची माहिती उर्जा संवर्धन पुरस्कारासाठी मागविण्यात आली होती. राज्यातील महापालिका या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. हा १७ वा उर्जा संवर्धन पुरस्कार आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि त्यांच्या सहकार्यांनी कल्याण डोंबिवली पालिकेने २००७ पासून केलेल्या उर्जा बचतीच्या उपाययोजना, अपारंपारिक स्त्रोतांचा प्रभावी वापर करुन पालिका क्षेत्रात कशाप्रकारे सरकारी वीजेचे अवलंबन कमी केले आहे याचे सादरीकरण शासनाच्या उच्चस्तरिय समितीसमोर केले. सप्टेंबरमध्ये हे सादरीकरण शासनाकडे पाठविण्यात आले होते. पालिकेने पदपथ दिवे, मल, जल निस्सारण, पाणी पुरवठा, उर्जा संवर्धन, उर्जा बचतीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती या उर्जा संवर्गातील सादरीकरणात होती. तसेच पालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालयात अल्पकाळात दिलेल्या वैद्यकीय, आवश्यक सुविधांची माहिती रुग्णालय संवर्गातील सादरीकरणात देण्यात आली होती, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
हेही वाचा- ठाणे जिल्ह्यात भूजल पातळी वाढविण्यासाठी एक हजार वनराई बंधारे
उपाययोजना
पालिका हद्दीतील जुने सोडियम व्हेपर दिवे काढून त्या जागी ३३ हजार स्मार्ट उर्जा कार्यक्षम दिवे बसविण्यात आले आहेत. पालिका हद्दीत नवीन इमारतीची उभारणी झाल्यानंतर त्या इमारतीवर जोपर्यंत सौर उर्जा सयंत्र बसविले जात नाही. तोपर्यंत पालिकेच्या नगररचना विभागाकडून त्या इमारतीला बांधकाम पूर्णत्व आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येत नाही. या सयंत्रामुळे एक हजार ८१४ इमारतींमध्ये सरकारी विजेचा वापर न करता गरम पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे एक कोटी सौर कार्यक्षम क्षमतेचे उष्ण जल उपलब्ध झाले आहे. घरातील पाणी उकळविण्यासाठी लागणाऱ्या गॅसची बचत झाली आहे. अनेक इमारतींनी सौर उर्जेवर इमारतीमधील उद्वहन सेवा सुरू ठेवली आहे. डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर मध्ये विकासक मिलिंद देशमुख यांनी अपारंपारिक उर्जा स्त्रोतांच्या प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. पालिका हद्दीतील ३५ इमारतींवर ०.५ मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प विकासकांकडून सुरू करण्यात आले आहेत. या नैसर्गिक उर्जा स्त्रोतांमुळे पालिकेची १८ कोटी युनिटची वीज बचत झाली आहे.
पाणी पुरवठा विभागाचे उल्हास नदी काठचे जुने पंप बदलून पालिकेने नवीन उर्जा बचतीचे पंप बसून घेतले आहेत. कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयात जुने पारंपारिक दिवे काढून उर्जा बचतीसाठी नवीन उर्जा बचतीचे एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. उर्जा कार्यक्षम उद्वहन यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असे भागवत यांनी सांगितले.
हेही वाचा- उल्हासनगर पालिकेची बस नव्या वर्षात धावणार; २० वीजेवरील बससाठी पालिकेने मागवल्या निविदा
मागील अनेक वर्षात पालिकेने अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा प्रभावी वापर पालिका हद्दीत सुरू केला आहे. बाह्य स्त्रोत विजेवरील अवलंबन यामुळे कमी झाले आहे. त्यामुळे १८ कोटी युनिटची वीज बचत प्रशासनाने केली आहे. या नैसर्गिक कार्यक्षम उर्जा स्त्रोतांचा अधिक अवलंब येत्या काळात प्रशासनाकडून केला जाणार आहे. त्या कामाची पावती म्हणजे हे दोन्ही पुरस्कार आहेत, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.