कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेकायदा बीअर-महिला बार, हुक्का पार्लर, नृत्यबार, ढाबे, पब्ज यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने गुरुवारपासून पालिका हद्दीतील बेकायदा बीअरबार, नृत्यबार, मद्यालये, हुक्का पार्लर, महाविद्यालये, शाळांच्या परिसरातील प्रतिबंधित खाद्य वस्तू विक्री केंद्रे आस्थापना भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली. दोन दिवसात सुमारे १०० हून अधिक आस्थपनांवर कारवाई करण्यात आली.
गेल्या आठवड्यात सर्व बेकायदा बार, ढाबे चालकांना पालिका-पोलिसांनी समन्वयाने नोटिसा पाठविल्या होत्या. पावसाळा सुरू असल्याने पालिकेकडून कारवाई होणार नाही या विचारात बार चालक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश असल्याने या कारवाईत पालिका अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली तर पालिका प्रशासन संबंधितांवर कारवाई करील. पोलिसांनी सहकार्य केले नाहीतर वरिष्ठांनी तशी कठोर भूमिका घेण्याचे पालिका आयुक्त जाखड यांनी स्पष्ट केले होते.
टिटवाळा, मांडा, कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, मुरबाड रस्ता, आंबिवली, आधारवाडी, कल्याण पूर्वेतील नेतिवली, मलंगड-नेवाळी रस्ता, शिळफाटा रस्ता, डोंबिवलीतील पाथर्ली नाका, आयरे, डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा, गरीबाचापाडा, गणेशनगर, कुंभारखाणपाडा, उमेशनगर भागातील बेकायदा बार, महिला बार, ढाबे जेसीबीच्या साहाय्याने पालिका पथकांनी जमीनदोस्त केले.
सोनारपाडा, दावडी भागातील तळघरात चोरून महिला सेविकांच्या माध्यमातून नृत्य बार चालविले जातात. हे बारही भुईसपाट करण्यात आले. डोंबिवलीत पाथर्ली येथील बेकायदा शिल्पा बार फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने जमीनदोस्त केला. आयरे, गांधीनगर शाळांच्या परिसरातील पानटपऱ्या ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांच्या पथकाने बंद केल्या.
हेही वाचा…ठाणे स्थानकाजवळ रेल्वेची संरक्षण भिंत कोसळली, वृद्ध जखमी
डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगरमध्ये स्वामी विवेकानंद शाळेजवळील पानटक्का या दुकानात साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना प्रतिबंधित गुटख्याचा साठा, नशा येण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, गांजापूड आढळून आली. हा सर्व साठा पालिका, विष्णुनगर पोलिसांनी जप्त करून पानटक्का दुकान मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या पान टपऱ्या सील ठोकून बंद करण्यात आल्या. कोळेगाव येथील साई कृपा रुक्मिणी हॉटेल ई प्रभाग साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने जमीनदोस्त केले. आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर यांनी मलंगगड रस्त्यावरील कशीश बार, रंगीला बार जमीनदोस्त केला.
ब प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी कोळवली येथील जेबी लाऊंज, खडकपाडा येथील फूड स्टॉल जमीनदोस्त केले. याशिवाय शाळा, बिर्ला महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई केली. अशीच कारवाई ड प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी केली.
हेही वाचा…डोंबिवलीतील नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नागरिकाला २० वर्षाचा कारावास
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अवधूत तावडे, उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या उपस्थितीत या कारवाया करण्यात आल्या. या कारवाईमुळे बार चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बार, शाळा परिसरातील पानटपऱ्यांवर पोलीसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात येत आहे. या आस्थापना पुन्हा सुरू होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. – डॉ. इंदुराणी जाखड, आयुक्त