लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : टिटवाळा-कल्याण-डोंबिवली ते शिळफाटा दरम्यानच्या ३० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्ते मार्गात अडसर ठरणारी १२५ बांधकामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे मागील काही वर्षापासून अटाळी भागात रखडलेला बाह्यवळण रस्ते मार्ग बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत टिटवाळा-आंबिवली अटाळी-गांधारे पूल-वाडेघर ते दुर्गाडी किल्ला-पत्रीपूल ते मोठागाव-कोपर-भोपर ते शिळफाटा- काटई-हेदुटणे असा ३० किलोमीटर लांबीचा कल्याण-डोंबिवली शहराबाहेरून जाणारा बाह्यवळण रस्ता उभारणीचे काम सुरू आहे. या रस्त्यामधील टिटवाळा ते वाडेघरपर्यंतचे रस्ते बांधणीचे टप्पे पूर्ण झाले आहेत. या टप्प्यामधील अटाळी भागात वळण रस्त्याच्या मार्गात १२५ चाळ, झोपड्यांची बांधकामे होती.
या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न काही वर्षापासून रखडला होता. हा प्रश्न आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या पुढाकाराने मार्गी लागला. त्यामुळे आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या पथकाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अटाळी भागातील बाह्यवळण रस्ते कामात अडथर ठरणारी १२५ बांधकामे जमीनदोस्त केली. या रस्ते मार्गात अटाळी येथे बांधकामे असल्याने एमएमआरडीएला त्या भागात रस्ता बांधणीचे काम करता येत नव्हते. या रस्ते कामातील दुर्गाडी किल्ला-पत्रीपूल ते ठाकुर्ली-खंबाळपाडा (खाडी किनारा भाग), डोंबिवलीतील गणेशनगर, राजूनगर, देवीचापाडा ते मोठागाव माणकोली पुलापर्यंतच्या रस्ते मार्गाचे काम एमएमआरडीएने सुरू केले आहे. या कामासाठीची बहुतांशी जमीन पालिकेने एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे.
आणखी वाचा-ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली
रस्त्याचा फायदा
टिटवाळा, कल्याण ते डोंबिवली-कोपर-भोपर-काटई ते हेदुटणे असा ३० किमीचा शहराबाहेरून जाणारा बाह्यवळण रस्ता आहे. कल्याण, डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी हा रस्ता महत्वपूर्ण आहे. डोंबिवली किंवा टिटवाळा, कल्याण येथील नागरिक बाह्यवळण रस्त्यामुळे कोंडीमुक्त प्रवास करतील. शिळफाटा, भिवंडी बाह्यवळण रस्त्यावरील कोंडी कमी होईल. मोठागाव माणकोली ते पत्रीपूल टप्पा पूर्ण झाल्यानंतर माणकोली पुलावरून प्रवाशांना डोंबिवलीत येण्याऐवजी शहराबाहेरून कल्याण, टिटवाळा दिशेने जाता येणार आहे.
अटाळी येथील काही भागात बाह्यवळण रस्ते मार्गात १२५ बांधकामे बाधित होती. या बांधकामातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या पुढाकाराने मार्गी लागला. आयुक्तांच्या आदेशावरून या महत्वपूर्ण वळण रस्ता टप्प्यातील १२५ बांधकामे तोडण्यात आली. -संदीप रोकडे, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग, टिटवाळा.
© The Indian Express (P) Ltd