कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी भागातील मौलवी कम्पाऊंडमधील मुनीर मौलवी या अतिधोकादायक इमारतीचा भाग अंगावर कोसळून मागील आठवड्यात एक पादचारी महिला आणि तिची मुलगी गंभीर जखमी झाली होती. या प्रकाराला या अतिधोकादायक इमारतीची घर मालकीण जबाबदार असल्याचा ठपका ठेवत कल्याण डोंबिवली पालिकेच्या क प्रभागाचे साहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने मागील अनेक वर्षात प्रथमच एका अतिधोकादायक इमारतीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवली आहे. आतापर्यंत अशाप्रकरणात घर मालकाला वाचविण्यात पालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे पालिका हद्दीत इमारती अतिधोकादायक होऊन त्या स्वतःहून तोडून घेण्यात, भाडेकरूंना सामंजस्याने घराबाहेर काढण्यात घर, इमारत मालक कधीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. पालिका हद्दीत एकूण ४६५ धोकादायक इमारती आहेत.

हेही वाचा…ठाणे : पाठ्यपुस्तके, गणवेशवाटपास खासगी शाळांचा नकार, ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांच्या नशिबी यंदाच्या वर्षीही प्रतीक्षा

गुन्हा का दाखल

कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी भागात शगुफ्ता मुनीर अहमद मौलवी यांच्या मालकीची मौलवी कम्पाऊंड आवारात मुनीर मौलवी इमारत आहे. ही इमारत चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आली आहे. या इमारतीची वेळोवेळी देखभाल न करण्यात आल्याने ही इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीत एकूण ३६ कुटुंब राहतात. त्यामधील काही सोडून गेली आहेत. मुनीर मौलवी इमारत धोकादायक झाल्याने पालिकेने मागील काही वर्षापासून या इमारतीच्या मालकीण आरोपी शगुफ्ता मौलवी यांना इमारत अतिधोकादायक झाल्याने त्यामधील कुटुंबांना बाहेर काढून ती इमारत स्वतःहून पाडून घेण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिसींची दखल मागील पाच ते सहा वर्षात मालकीण शगुफ्ता यांनी घेतली नाही.

गेल्या शनिवारी सकाळी शगुफ्ता यांच्या मुनीर मौलवी इमारतीचा काही भाग सकाळच्या वेळेत अचानक कोसळला. कोसळलेला भाग या इमारती लगतच्या रस्त्यावरून पायी चाललेल्या मेहरूनिस्सा अशपाक शेख आणि त्यांची मुलगी तस्मिया शेख यांच्या अंगावर पडला. विटा, सिमेंट काँक्रीटचा लगदा अचानक अंगावर पडल्याने या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

हेही वाचा…उल्हासनगर पालिकेत ‘डमी’ कर्मचारी

मुनीर मौलवी इमारतीच्या मालकीण शुगुफ्ता मौलवी यांना नियमित इमारत धोकादायक झाल्याच्या नोटिसा पाठवूनही त्याची त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे इमारतीचा भाग कोसळून दोन महिलांना गंभीर जखमी करण्यात मालकीण शगुफ्ता जबाबदार आहेत, असा ठपका ठेवत कल्याण डोंबिवली पालिकेच्या क प्रभागाचे साहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात शगुफ्ता यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमान गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipality takes action against landlady of dangerous building psg