कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी बीअरबार, मद्य विक्रीची दुकाने अनधिकृत इमारतीत सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे यापुढे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बीअरबार, मद्य विक्रीचे परवाने देताना पालिका प्रशासनाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी गुरुवारी माध्यमांना दिली.
राज्यातील बेकायदा बीअरबार, पब्ज, हुक्का पार्लर, प्रतिबंधित खाद्य वस्तू विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस, पालिका, उत्पादन शुल्क विभाग यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिका हद्दीतील पोलीस प्रमुख, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पालिका अधिकारी यांची पालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेतली. आणि पालिका हद्दीतील सर्व बेकायदा बीअरबार, पब्ज, हुक्का पार्लर, शाळा परिसरात असलेल्या प्रतिबंधित खाद्य वस्तू विकणाऱ्या पान टपऱ्या जमीनदोस्त करण्याचे आदेश या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
हेही वाचा…ठाणे स्थानकाजवळ रेल्वेची संरक्षण भिंत कोसळली, वृद्ध जखमी
ही कारवाई पालिका, पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकारी यांनी एकत्रितपणे करायची आहे, असे आयुक्तांनी सूचित केले. या कारवाईत कोणी हयगय केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, या कारवाईत कोणी अडथळा आणला तर त्याचा विचार केला जाणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच कारवाईचे आदेश दिले असल्याने कारवाईत कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी बीअरबार, मद्य विक्रीची दुकाने, पब्ज, हुक्का पार्लर, गुटखा सदृश्य वस्तू विक्री करणाऱ्या टपऱ्या, गाळे बेकायदा इमारतीत सुरू आहेत. या इमारतींना पालिकेची परवानगी नाही. अशा बेकायदा इमारतीत बीअरबार, मद्य विक्री दुकाने, शासन प्रतिबंधित सुविधा सुरू असतील तर ते नियमबाह्य आहे. त्यामुळे यापुढील काळात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाला बीअरबार, मद्यविक्रीचे परवाने द्यायचे असतील तर ही दुकाने अनधिकृत इमारतीत सुरू होऊ नयेत म्हणून उत्पादन शुल्क विभागाने पालिका प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी यासंदर्भात एक सविस्तर पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.
हेही वाचा…डोंबिवलीतील नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नागरिकाला २० वर्षाचा कारावास
पोलिसांनी कल्याण, डोंबिवली परिसरातील ज्या परमिट रूम, बीअरबार, मद्य विक्रेत्यांवर यापूर्वी गु्न्हे दाखल केले आहेत. त्याची यादी पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे दिली आहे. या यादीप्रमाणे संबंधित विक्रेत्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पालिका हद्दीत किती नियमबाह्य बिअरबार, मद्य विक्री दुकाने आहेत याची यादी उत्पादन शुल्क विभागाकडून पालिकेला देण्यात येणार आहे. या यादीप्रमाणे पालिका पोलिसांच्या सहकार्याने संबंधित आस्थापनांवर कारवाई करणार आहे, असा इशारा आयुक्त डॉ.जाखड यांनी दिला आहे.