कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेने हरित उर्जा आणि उर्जा संवर्धनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेराव्या ग्रीन एनर्जी समितीमध्ये इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सतर्फे कल्याण डोंबिवली पालिकेला हरित उर्जा आणि उर्जा संवर्धनाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले.दिल्ली येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

देशभरातील महापालिकांमधून कल्याण डोंबिवली पालिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली. अलीकडेच पालिकेला उत्कृष्ट ऑनलाईन गतिमान प्रशासकीय कामकाजाबद्दल दिल्लीतील स्काॅच संस्थेतर्फे महापालिका सुवर्ण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. उर्जा संवर्धनाचा विचार करून कल्याण डोंबिवली पालिकेने २००७ पासून पालिका हद्दीत नव्याने उभ्या राहणाऱ्या अधिकृत इमारतींवर सौर उर्जा सयंत्रे बसविण्याची सक्ती केली आहे. या यंत्रणेची पालिकेच्या विद्युत विभागाने प्रभावी अंमलबजावणी केली आहे. सन २००७ ते २०२१ या कालावधीत कल्याण, डोंबिवलीतील एक हजार ८३२ इमारतींवर एक कोटी आठ लाख लीटर्स प्रती दिन क्षमतेची सौर उष्ण जल सयंत्रे विकासकांकडून बसविण्यात आली. यामुळे घरांंमध्ये पाणी तापविण्यासाठी गिझरचा वापर केला जात नाही. दरवर्षी सौर यंत्रणेमुळे १८ कोटी वीज युनीटची वीज बचत होत आहे, असे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी सांंगितले.

२०२१ पासून पालिकेने विकासकांना सौर उर्जा निर्मिती करणारे रूफ टाॅप नेट मीटर बसविणे बंधनकारक केले आहे. या माध्यमातून १९७ इमारतींवर ३.६ मेगा वॅट क्षमतेचे रूप टाॅप नेट मीटर बसविण्यात आल्याने दरवर्षी ५२ लाख सौर उर्जा निर्मिती होत आहे. या सौर उर्जेवर सोसायट्यांमधील उदवाहन चालते, दिवे, जिन्यांमधील दिवे प्रज्वलित केले जातात. १० प्रभागांमध्ये १६० किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी सयंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. मोहिली जलशुध्दीकरण केंद्र, कपोते वाहनतळ येथे १२० किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी सयंत्रे बसविण्यात आली आहेत. पालिकेच्या १५ इमारतींवर ०.४४ मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा सयंत्रे आस्थापित केली आहेत. दरवर्षी ६.३४ लाख सौर उर्जा युनिट उत्पादन होत आहे. उर्जा बचत करणारे एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत. कार्यालयांमधील वीज दिव्यांची रचना उर्जा बचत करणारी आहे.

उर्जा संवर्धन आणि सौर उर्जेचा अधिकाधिक नागरिकांनी वापर करावा म्हणून पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांसमोर जाताना पालिकेने सौर उर्जा निर्मिती, वीज बचतीचे अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. नागरिकांना पथनाट्य, जनजागृती कार्यक्रमातून सौर उर्जेचे महत्व पटवून दिले जात आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये हे कार्यक्रम अधिक घेतले जातात. प्रशांत भागवत कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग.

Story img Loader