कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागातील घनकचरा विभागातील वाहन चालक कामगार विनोद मनोहर लकेश्री यांच्या विरुध्द विकासक प्रफुल्ल गोरे यांच्या तक्रारीवरून खंडणी विरोधी पथकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने लकेश्री यांना पालिका सेवेतून निलंबित केले आहे. आता आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी या प्रकरणी दोषारोप पत्र तयार करून लकेश्री यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, ठाणे येथील खंडणी विरोधी पथकाकडून विनोद लकेश्री प्रकरणाचा तपास सुरू आहे. लकेश्री हे कल्याण डोंबिवली पालिकेचे कर्मचारी आहेत. त्यामुळे खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी पालिका मुख्यालयात येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. लकेश्री यांच्या संदर्भात यापूर्वी पालिकेत विकासक किंवा अन्य कोणाकडून काही तक्रारी आल्या आहेत का, याची माहिती देण्याची मागणी पालिका अधिकाऱ्यांकडे केली. पालिका अधिकाऱ्यांनी अभिलेख तपासून याबाबतची सर्व माहिती देण्याची तयारी खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना दर्शवली आहे.

हेही वाचा…डोंबिवलीजवळ हेदुटणे, उत्तरशिव येथे गिरणी कामगारांच्या घरांना जमिनी देण्यास मनसेचा विरोध

आयुक्त डॉ. जाखड यांनी लकेश्री प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणी कामगार लकेश्री यांच्यावर दाखल गुन्ह्याप्रमाणे दोषारोप पत्र पालिकेने तयार करावे आणि त्यांची विभागीय चौकशी प्रशासनाने सुरू करावी, असे आदेश आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांना दिले आहेत.

दरम्यान, विनोद लकेश्री प्रकरणात पालिकेच्या तत्कालीन उपायुक्त, फ, ह, अ, ग प्रभागात यापूर्वी काम केलेल्या काही साहाय्यक आयुक्ता्ंची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्राने दिली. या हालचालींमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या काही साहाय्यक आयुक्त, अधीक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा…ठाणे, रायगड परिसरातील गुंतवणूकदारांची डोंबिवलीतील सिनर्जी इन्व्हेसमेंट कंपनीकडून १० कोटीची फसवणूक

भंडारीची पाठराखण

ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांना कार्यालयात शिवीगाळ करणाऱ्या ह प्रभागातील सफाई कामगार दिलीप उर्फ बुवा भंडारी यांना सामान्य प्रशासन विभागाने नोटीस देऊनही मागील तीन महिन्याच्या कालावधीत भंडारी यांच्यावर सामान्य प्रशासन विभाग किंवा घनकचरा विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भंडारी हे सफाई कामगार असुनही ते ह प्रभागात फेरीवाला हटाव पथकात कार्यरत आहेत. भंडारी यांनी आपल्या मुलाच्या नावे तीन महिन्यापूर्वी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात आंबे विक्रीसाठी बेकायदा मंच उभारला होता. तो कुमावत यांच्या आदेशावरून तत्कालीन अधीक्षक किशोर ठाकुर यांनी तोडला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या भंडारी यांनी कुमावत यांना अरेरावी आणि शिवीगाळ केली होती. आयुक्त डॉ. जाखड यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी कर्मचारी करत आहेत.

हेही वाचा…ठाण्याच्या मध्यवर्ती भागात दोन वाहनतळांची उभारणी, दीड वर्षात वाहनतळ उभारणीचा पालिकेचे मानस

डोंबिवली पश्चिमेत राजूनगर भागात एका भाजीमंडईच्या आरक्षणावर बेकायदा व्यायामशाळा काही स्थानिकांनी सुरू केली आहे. याप्रकरणी पालिकेच्या मालमत्ता विभागाने यापूर्वी कारवाई सुरू केली होती. अद्याप मंडई जागेत व्यायाम शाळा सुरूच असल्याने स्थानिक रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. आयुक्तांनी याप्रकरणाची माहिती घेण्याची मागणी होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipality worker suspended faces departmental inquiry for extortion psg
Show comments