कल्याण : एका ठेकेदाराकडून कामाच्या बदल्यात लाच स्वीकारणारा कल्याण डोंबिवली पालिकेच्या दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाचा कनिष्ठ अभियता तथा प्रयोगशाळा साहाय्यक संजय सोमवंशी यांना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबित केले.
अभियंता सोमवंशी यांना निवृत्तीला चार महिने शिल्लक असताना, ते लाचखोरीच्या सापळ्यात अडकले. सोमवंशी यांच्या लाचखोरीमुळे कल्याण डोंबिवली पालिकेतील मागील २५ वर्षातील एकूण लाचखोर कर्मचाऱ्यांची संख्या आता ४४ झाली आहे. राज्यातील २७ महापालिकांमध्ये सर्वाधिक टक्केवारी आणि लाचखोरीचे प्रकार कल्याण डोंबिवली पालिकेत चालतात, याविषयी शासनाकडे गोपनीय विभागाचे अहवाल आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेत वर्णी लागण्यासाठी शासकीय सेवेतील अधिकारी राजकीय दबाव आणि मुख्याधिकाऱ्यांच्या मंंत्रालयात वजन असलेल्या एका गटसमुहाच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते.
सोमवंशी सापळ्यात
एका ठेकेदाराकडून कामाच्या बदल्यात पालिका मुख्यालयातील आपल्या दालनात कनिष्ठ अभियंता संजय सोमवंशी पैशाची लाच स्वीकारत आहेत, अशी दृश्यध्वनी चित्रफित सोमवारी दुपारी समाज माध्यमांवर प्रसारीत झाली. या दृश्यध्वनी चित्रफितीमध्ये अभियंता सोमवंशी हे लाच देणाऱ्या ठेकेदाराला, तो घ्यायला येतो एक आणि देतो एक. नमस्कार करतो आणि निघून जातो, असे बोलत असल्याचे दिसते. गटार आणि काँक्रिट रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीच्या कामासाठी सोमवंशी यांनी ही लाच ठेकेदाराकडून स्वीकारली असल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात येते. तर, ध्वजनिधी संकलनासाठी ही रक्कम स्वीकारली असल्याचा बचावात्मक पवित्रा सोमवंशी यांनी घेतला असल्याचे प्रशासनातील चर्चेतून समजते. सोमवंशी यांना संपर्क साधला, तो होऊ शकला नाही.
हे ही वाचा…ठाणे : कोंडीनंतर अधिकाऱ्यांना जाग, उड्डाणपुलांलगत तात्पुरती दुरूस्ती, रस्त्यांच्या पाहाणीला सुरूवात
तात्काळ निलंबित
पालिका मुख्यालयातील दक्षता व गुणनियंत्रण विभागाचा अभियंता लाच घेतानाची दृश्यध्वनी चित्रफित प्रसारित झाल्याची माहिती आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना समजली. त्यांनी या विषयीची माहिती घेऊन तात्काळ कनिष्ठ अभियंता संजय सोमवंशी यांना पालिका सेवेतून निलंबित केले. त्त्यांची विभागीय चौकशी लावण्याचे आदेश आयुक्तांनी तात्काळ दिले. या तडकाफडकी आणि आक्रमक कारवाईंमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे. दोन महिन्यापूर्वी खंडणीचा गु्न्हा दाखल होताच पालिका सेवेतील वाहन चालक कामगार विनोद लकेश्री यांना आयुक्तांनी तात्काळ निलंबित केले होते. पालिका हद्दीतील रस्ते, गटार आणि इतर विकास कामे दर्जेदार होतात की नाही हे पाहणे पालिकेच्या दक्षता गुणनियंत्रण विभागाचे काम आहे. या विभागातील अभियंते मागील २५ वर्ष ठेकेदाराकडून चिरीमिरी घेऊन निकृष्ट कामांची पाठराखण करण्यात समाधान मानत आहेत. त्यामुळे पालिका हद्दीतील रस्ते कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी आहेत.
हे ही वाचा…ठाणेकरांना ७२ तासआधी हवा गुणवत्ता कळणार? हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित
प्रतिक्रिया
पालिका प्रशासनात काम करताना कोणत्याही कर्मचाऱ्याची गैरवर्तवणूक आणि गैरकाम खपवून घेतले जाणार नाही. गैरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल. डाॅ. इंदुराणी जाखड आयुक्त.