कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यांवर हे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने गस्ती पोलीस करतात काय, असा प्रश्न नागरिकांकडून संतप्तपणे उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही, असे प्रश्न नागरिक करत आहेत. १९९० दशकात ज्या कल्याण डोंबिवली शहरात मंचेकर यांच्यासह इतर टोळ्यांचा बिमोड पोलिसांनी केला. त्याच शहरातील किरकोळ चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांना का शक्य होत नाही असा रहिवाशांचा सवाल आहे.
कल्याण पश्चिमेतील टिळक चौकात चैतन्य प्रसन्न सहनिवासमध्ये धनंजय शिंदे यांचे घर आहे. सप्टेंबरपासून त्यांचे घर बंद होते. या कालावधीत चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करुन चोरी केली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगार बार जवळ जाहिदा पिरजादे यांचे घर आहे. गेल्या आठवड्यापासून काही कामानिमित्त त्या बाहेरगावी गेल्या होत्या. या कालावधीत चोरट्याने त्यांच्या घरात दरवाजाचा कोयंडा तोडून प्रवेश केला. कपाटातील सोन्याचा ७१ हजार रुपयांचा ऐवज, दूरचित्रवाणी संच चोरून नेला. घरी परतल्यानंतर त्यांना हा चोरीचा प्रकार दिसून आला. मानपाडा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली आहे.
हेही वाचा… ठाणे: आयुक्त अभिजीत बांगर सुट्टीवर गेल्याने महापालिकेत शुकशुकाट
कल्याण पूर्व कोळसेवाडी भागात राहणाऱ्या माधुरी जाधव, त्यांचे पती नोकरी करतात. मुलगी शाळेत जाते. सोमवारी सकाळी हे कुटुंब नेहमीप्रमाणे कामावर गेले. मुलगी शाळेत गेली. त्यानंतर दुपारच्या वेळेत अनोळखी इसमाने घरात दरवाजाची कडी तोडून प्रवेश केला. सामानाची नासधूस केली. घरातील कपाटात ठेवलेले एक लाख ९३ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने चोरून नेले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली आहे. डोंबिवलीतील ठाकुर्ली जवळील म्हसोबा चौकात पराग पवार यांचे कार्यालय आहे. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने पवार कार्यालयात गेले नाहीत. या कालावधीत चोरट्याने कार्यालयाचे लोखंडी प्रवेशव्दार तोडून आत प्रवेश केला. कार्यालयातील लॅपटाॅप, मोबाईल, बायोमेट्रिक यंत्र असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
लोकसेवेपेक्षा पोलीस राजकीय सेवेत अधिक व्यस्त असल्याची चर्चा शहरात विविध स्तरांमध्ये सुरू आहे. वजनदार लोकप्रतिनिधींकडून, त्यांच्या स्वीय साहाय्यकांकडून येणारे फोन आणि त्याची अंमलबजावणी करण्यात अधिकारी सर्वाधिक व्यस्त असल्याची चर्चा कल्याण, डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात आहे.