कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गेल्या १५ वर्षाच्या कालावधीत शहराच्या विविध भागात झालेली अस्ताव्यस्त बेकायदा बांधकामे कल्याण, डोंबिवली शहरे जलमय करण्यास कारणीभूत आहेत. ही बांधकामे करताना नैसर्गिक स्त्रोत, गटारे, विकास आराखड्यातील रस्ते, आरक्षित भूखंड भूमाफियांनी हडप केले आहेत. त्याचा फटका आता मुसळधार पावसाच्या माध्यमातून रहिवाशांना बसण्यास सुरुवात झाली आहे, असे शहरातील काही नियोजनकर्त्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गेल्या २४ वर्षाच्या कालावधीत एकूण दोन लाख ३५ हजार बेकायदा उभी राहिली. मागील पाच वर्षापासून या बेकायदा बांधकाम वाढीचा वेग अधिक आहे. करोना साथीच्या काळात सर्व ठप्प असताना सर्वाधिक बेकायदा बांधकामे उभी राहिली. अलीकडेच पालिकेतून मिळालेल्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षभरात आठ हजार ५०० बेकायदा बांधकामे पालिका हद्दीत उभी राहिली आहेत.
कल्याण पूर्वेतील आडिवली-ढोकळी, व्दारली, पिसवली, नेतिवली, खडेगोळवली, चिंचपाडा भागातील बहुतांशी मुख्य, अंतर्गत रस्ते बुधवारी मुसळधार पावसाने जलमय झाले होते. आडिवली ढोकळी भागात ५०० हून अधिक बेकायदा बांधकामे मागील १० वर्षाच्या काळात उभी राहिली आहेत. कल्याण पूर्व भौगोलिकदृष्ट्या उंच भागावरील उतार असलेला वसाहतीचा परिसर. अलीकडे कल्याण पूर्व भागातील अनेक परिसर जलमय होऊ लागले आहेत. नेतिवली ते मलंग रस्त्याच्या दोन्ही बाजुचे नैसर्गिक नाले माफियांनी बांधकामे करुन बुजविले. नेतिवली, व्दारली, आडिवली ढोकळी भागातील पावसाचे पाणी मलंग रस्त्यावर येऊन तेथे समुद्र तयार होत आहे.
हेही वाचा >>> Maharashtra News Live देवेंद्र फडणवीस झोपेत बोलत असतील, संजय राऊत यांची टीका
टिटवाळा भागातील बल्याणी, मांडा, मोहने, आंबिवली भागात बेसुमार बेकायदा बांधकामे झाली आहेत. अशीच परिस्थिती डोंबिवलीतील आयरे, नांदिवली, २७ गाव, शिळफाटा रस्ता, पश्चिमेतील देवीचापाडा, गरीबाचापाडा, राजूनगर, गणेशनगर, कुंभारखाणपाडा, कोपर भागात आहे. शहराच्या परिघ क्षेत्रावरील मोकळे असलेले भाग आता बेकायदा चाळी, इमारतींनी बंदिस्त झाले आहेत. पाऊस सुरू झाला की हे भाग आत थोड्याशा पावसात तुंबत आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवलीत घर खरेदीदाराची फसवणूक
डोंबिवली एमआयडीसी हद्दीत काँक्रीट रस्त्यांची बांधणी करताना रस्ता दोन फूट खाली खोदून मग रस्त्याची बांधणी होणे आवश्यक होते. तसे न करता आहे त्या रस्त्यावर किरकोळ खोदाई करुन काँक्रीट रस्ते एमआयडीसी हद्दीत बांधण्यात येत आहेत. त्यामुळे रस्ते अडीच फूट उंच आणि आजुबाजुच्या निवासी सोसायट्या, बंगले तेवढ्याच अंतराने खाली असे चित्र एमआयडीसी हद्दीत आहे. एमआयडीसीतील बहुतांशी सोसायट्यांचे तळ किरकोळ पावसात तुंबण्यास सुरुवात होते, असे रहिवाशांनी सांगितले.
खड्डे कमी करण्यासाठी शहरात होत असलेले काँक्रीटच्या रस्त्यांमुळे जमिनीत पाणी मुरण्यास कोठेच जागा नाही. पावसाचा प्रत्येक थेंब वाट मिळेल तेथे वाहून जाण्यास मार्ग शोधतो. या सर्वच मार्गिका आता बंद झाल्याने कल्याण, डोंबिवली शहरे दोन दिवसापासूनच्या मुसळधार पावसाने जलमय झाली. या पूरपरिस्थितीचा आतापासून विचार केला नाहीतर येणाऱ्या काळात प्रशासनासह रहिवाशांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागेल, अशी भीती काही नियोजनकर्त्यांनी वर्तवली.