लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : गणशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले होते. परंतु, अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे आहेत. या खड्डे मार्गातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आठ ते दहा फूट उंचीचा गणपती नेताना मोठी कसरत करावी लागते. संध्याकाळी नोकरदार वर्ग घरी येण्याच्या वेळेत मंडळे गणपती आगमन मिरवणुका काढत असल्याने कल्याण, डोंबिवली शहरे गेल्या आठवड्यापासून वाहन कोंडीत अडकत आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रात्री साडे अकरा ते पहाटेच्या वेळेत आपले गणपती मखरात नेण्याची सूचना पालिका, पोलीस अधिकारी, जाणकार नागरिकांनी मंडळांना केल्या आहेत. परंतु, आपल्या गणपतीचे झगमगाटी रूप नागरिकांना अगोदरच पाहता यावे यासाठी गणेशोत्सव मंडळे संध्याकाळच्या वेळेत शहरातून गणपती आगमन मिरवणुका काढत आहेत.
आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली
कल्याण, डोंबिवलीतील बहुतांशी वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजविण्यात आले नाहीत. दोन वर्षापूर्वी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी गणेशोत्सवापूर्वी सात दिवस दिवस, रात्र ठेकेदारांना काम लावून स्वता कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून रस्ते सुस्थितीत केले होते. या खड्ड्यांवरून कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी पालिकेला गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले नाहीतर शिवसेना पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. डोंबिवलीत मनसेने खड्ड्यांवरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
खड्डे भरणीसाठी २२ कोटीची तरतूद आणि १० ठेकेदार नेमलेले असताना ते गेले कोठे. त्यांची यंत्रणा आहे कोठे, असे प्रश्न संतप्त नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित करत आहेत. पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याने त्याचा गैरफायदा अधिकारी, ठेकेदार घेत असल्याची टीका सर्वस्तरातून सुरू झाली आहे. उल्हासनगर मध्ये गणपती आगमन मिरवणूक काढताना वाहन कोंडी केली म्हणून उल्हासनगरच्या वाहतूक विभागाने गेल्या आठवड्यात एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी कृती कल्याण, डोंबिवली वाहतूक विभागाने करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
ठाकुर्ली पूल कोंडीत
डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील बहुतांशी वाहने ठाकुर्ली पुलावरून पूर्व भागातून स. वा. जोशी शाळा येथे डावे वळण घेऊन निमुळत्या अरूंद रस्त्यावरून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडून ९० फुटी रस्त्यावर जातात. या वळणावरून अवजड वाहनेही चालक घुसवितात. त्यामुळे ठाकुर्लीकडून येणारी आणि जाणारी वाहने पुलावर अडकून पडतात.
शनिवारी दुपारी एका शाळेची बस शाळेच्या निष्काळजीपणामुळे ठाकुर्ली पुलावर बंद पडली होती. या बसचा इंजिनला पुरवठा करणारा पेट्रोल पाईप फुटला होता. शाळेने या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केले. पुलावर बस बंद पडून वाहन कोंडी झाली म्हणून डोंबिवली वाहतूक विभागाने शाळा व्यवस्थापनाला कारवाईची नोटीस पाठवली आहे.
आणखी वाचा-अंबरनाथ गोळीबारातील दोन जण डोंबिवलीतील घारिवलीत अटक
सर्वाधिक कोंडी
कल्याणमध्ये शिवाजी चौक, सहजानंद चौक, सम्राट चौक, बाईचा पुतळा, रामबाग गल्ली, डोंबिवलीत टंडन रस्ता दत्तनगर चौक, दिनदयाळ चौक, कोल्हापुरे इस्टेट चौक, इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक, फडके रस्ता.
गणेशोत्सव तोंडावर आला तरी पालिकेकडून खड्डे भरण्याची कामे पूर्ण करण्यात आलेली नाही हे गंभीर आहे. गणपती पूर्वी ही कामे पूर्ण करण्यात आली नाही तर शिवसेना पद्धतीने पालिके विरुद्ध आंदोलन करू. -विश्वनाथ भोईर, आमदार, कल्याण पश्चिम